आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेतील दूध संघाच्या खात्याची ‘ईडी’कडून झडती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटाबंदीनंतर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी नोटा जमा झाल्याच्या संशयावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी (७ जानेवारी) बँकेवर छापा मारला. या वेळी जिल्हा दूध संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम संशयास्पद वाटल्याने पथकाने दूध संघालाही चौकशीसाठी बोलावले होते. बँकेने उपलब्ध दस्तऐवज दिले, मात्र दूध संघाला जमा केलेल्या रकमेचा तपशील देता आला नाही. दोन दिवसांमध्ये सर्व तपशील पाठवून द्या, असे अादेश दूध संघाला देऊन पथक मुंबईला परतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
नोटाबंदीनंतर पहिल्या चार दिवसांपर्यंत जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत केंद्राकडून कुठलाच निर्णय झाला नव्हता. चार दिवसांनी जुन्या नोटा स्वीकारण्यावर जिल्हा बँकांवर बंदी आली. पहिल्या चार दिवसांमध्ये जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये ३९ कोटी ७५ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या. तसेच नोटाबंदीच्या दिवशीच्या क्लोजिंगमध्ये जिल्हा बँकेकडे १५ कोटी ९० लाख रुपये जमा होते. दरम्यान, हा व्यवहार संशयास्पद वाटल्याने सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबईतील त्रिसदस्यीय पथकाने जिल्हा बँकेसह जिल्हा दूध संघाचीही झडती घेतली. 

दूध संघाला बोलावणे: जिल्हाबँकेत कुणाच्या खात्यावर किती जुन्या नोटा जमा झाल्या, प्रतिदिन, प्रतिशाखा किती रुपयांच्या नोटा जमा झाल्या याचा तपशील या पथकाने तपासला. यामध्ये जिल्हा दूध संघाच्या खात्यावर संशयास्पद रक्कम जमा झाल्याचे आढळल्याने या पथकाने तात्काळ दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना बँकेत बोलावून जमा रकमेचा तपशील विचारला. मात्र, ऐनवेळी या रकमेचा तपशील त्यांना देता आला नाही. दोन दिवसांत सर्व तपशील सक्तवसुली संचालनालयाकडे सादर केला जाईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर पथक मुंबईला परतले. 

सर्वव्यवहार पारदर्शी : आमचासर्व व्यवहार पारदर्शी झाला आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने केलेल्या तपासणीमध्ये विशेष काही आढळले नाही. नोटाबंदीनंतर जमा झालेल्या जुन्या नोटांचा तपशील घेऊन पथक परत गेले. पथकाला आवश्यक ती सर्व माहिती दिली, असे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक शेषराव काटकर म्हणाले. 
 
दोन दिवसांत ‘ईडी’ला माहिती देऊ 
सुरुवातीचे काही दिवस दूध केंद्रांना पाचशे आणि जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा होती. त्यानुसारच आम्ही वितरकांकडून जुन्या नाेटा घेऊन बँकेत भरल्या. या सर्व रकमेचा तपशील पथकाला तत्काळ देता आला नाही. दोन दिवसांमध्ये सर्व माहिती आम्ही पाठवणार आहोत. आमचा व्यवहार संशयास्पद नाही- प्रदीपपाटील, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा सहकारी दूध संघ 

तपशील पुढीलप्रमाणे 
दूध संघ सरकारी असल्याबाबतचा दाखला 
कोणत्या बँकेत कधी आणि किती रुपयांच्या जुन्या नोटा भरल्या? 
भरलेल्या नोटा कुठून आल्या? 
ज्यांच्याकडून या नोटा स्वीकारल्या त्या व्यक्तींचे पॅनकार्ड