आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Office bearers And Representatives Meeting

खासदार खैरेंची पुन्हा कोंडी, पालकमंत्र्यांनी थेट मातोश्रीवरून महापौरांना दिले संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दीड महिन्यापूर्वी समांतर जलवाहिनीचा करार रद्द करण्यावरून पालकमंत्री रामदास कदम यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांची कोंडी केली होती. ती अजून फुटली नसतानाच विकास आराखड्यातील आरक्षण बदलावरून गुरुवारी (२८ जानेवारी) पुन्हा कोंडीची पुनरावृत्ती करण्यात आली. यात कदमांनी थेट मातोश्रीवरून सूत्रे हलवली.
प्रकाश महाजन यांना आयुक्तपदी कायम ठेवावे, असा खैरेंचा आग्रह होता. तो कदमांनी मोडीत काढला. समांतरला नोटीस देऊ नये, यासाठी खैरे धडपडत होते. त्याला कदमांनी यश मिळू दिले नाही. त्यानंतर शहर विकास आराखड्यातील आरक्षणांचा मुद्दा खैरे यांनी उचलला. नागरिकांच्या भेटी घेऊन तुमची आरक्षणे बदलून टाकेन, असे आश्वासन दिले. त्यानुसार महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासाठी आरक्षण बदलाचे फर्मानवजा निवेदन काढले. मात्र, तुपे निवेदन घेण्यासाठी फिरकलेच नाही. त्यामुळे खैरे भडकले. दुष्काळी स्थितीवर उपाययोजनेसाठी तापडिया नाट्य मंदिरात आयोजित पक्षाच्या बैठकीत त्यांनी तुपेंवर तोफ डागली.

दुष्काळाचा सामना करताना शेतकऱ्यांच्या पाठीशी कसे उभे रहावे, त्यांना कशी मदत करावी, संघटना कशी बांधावी, हा या बैठकीचा विषय होता. परंतु खैरे यांनी फक्त विकास आराखड्याच्याच विषय लावून धरला. जाहीर कार्यक्रमात त्यांनी महापौरांना निवेदन द्यायचे होते. उपनेता या नात्याने दिलेल्या निवेदनानुसार गुरुवारी दुपारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आरक्षण बदलावे, असा त्यांचा हट्ट होता. परंतु महापौर तुपे या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाहीत. ते मुद्दाम येणार नसल्याचे समजल्यानंतर माईक हाती आल्यानंतर खैरे यांनी महापौरांविरुद्ध अक्षरश: थयथयाट केला. खैरे म्हणाले, महापौर कोणाचेच ऐकत नाहीत. विकास आराखड्यातील बदल त्यांनी महापौर बंगल्यावर बसून केले. त्यात लोकांचा विचार केला नाही. मनाला वाटेल तसे त्यांनी आरक्षण बदलले आहेत. पक्षादेश ते पाळत नाहीत. शिवसेनेच्या कार्यक्रमाला मुद्दाम आले नाहीत. सभागृहनेत्याला पालिका कळत नाही, तरीही तो कोणाचे ऐकत नाही. खैरेंच्या या आरोपांवर घोसाळकर यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. जिल्हाप्रमुख, अन्य शहरप्रमुखही फक्त बघत होते. खैरेंच्या बोलण्याचे कोणालाही गांभीर्य नसल्याचे दिसून आले. यावर प्रतिक्रिया देण्यास महापौर तुपे यांनी नकार दिला.

मनोमिलन दिखावाच : खैरेकदम यांच्यात मनोमिलन झाल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी निर्माण झाले होते. परंतु गुरुवारच्या कार्यक्रमानंतर ते मनोमिलन केवळ दिसण्यापूरतेच असल्याचेही मेळाव्यात स्पष्ट झाले. खैरे - कदमांचे सख्य किती दिवस टिकणार असा प्रश्न तेव्हाच कार्यकर्ते विचारत होते. त्याचे उत्तर या वेळी अनेकांना मिळाले.

महापौर नाराज
सभागृहसुरू असतानाच निरोप पाठवून खैरेंनी महापौरांना झापले. त्यामुळे नाराज झालेले तुपे उपमहापौर राठोड यांच्याकडे सूत्रे देऊन सभागृहाच्या अँटीचेंबरमध्ये जाऊन बसले. तेथे खैरेंनी मोबाईलवर संपर्क साधून तुमची मातोश्रीवर तक्रार करतो, असेही धमकावले. ते ऐकून तुपे गारच झाले.

कदमांनी संपर्क साधला
पालकमंत्री कदमांपर्यंत खैरेंची कामगिरी पोहोचली. त्यांनी तुपेंशी संपर्क साधला. सूत्रांनी सांगितले की, खैरे काय म्हणतात, याकडे लक्ष देऊ नका. मी मातोश्रीवर बोललो आहे, असे कदम म्हणाले. त्यानंतर मातोश्रीवरूनही तुपेंना खैरेंचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा संदेश आला. तो पाहून तुपे सभागृहात परतले आणि त्यांनी रात्री उशिरा खैरेंनी पाठवलेले निवेदन ठेवून घेतले.

जंजाळांनी हाकलले
खैरेंच्या सांगण्यावरून शिल्पाराणी वाडकर, स्वाती नागरे, शीतल गादगे, संतोष जेजूरकर, बाळासाहेब थोरात मनपात आरक्षण बदलाची निवेदन घेऊन पोहोचले. ते महापौरांकडे जाण्यापूर्वीच सभागृहनेता जंजाळ यांनी त्यांना रोखले. आम्ही निर्णय घेण्यास सक्षम आहोत. कुणाच्याही निवेदनाची गरज नाही, असे म्हणत हाकलून दिले.