आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाईमुळे व्हीआयपी रस्त्याचा श्वास मोकळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चारचाकी वाहनांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. भडकलगेट येथील एक कार क्रेनने उचलून पथकाच्या ट्रकमध्ये ठेवताना कर्मचारी. )
औरंगाबाद- जिल्हाधिकारी कार्यालय ते सिद्धार्थ उद्यान या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली अतिक्रमणे शुक्रवारी काढण्यात आली. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीतून या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. वाहतूक पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेच्या वतीने ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. नागरिक, वाहनचालकांनीही या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले.
पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालय ते सिद्धार्थ उद्यानाच्या आजूबाजूला असलेली अतिक्रमणे आणि गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या भंगार गाड्या या वेळी क्रेन लावून उचलून नेण्यात आल्या. सकाळी नऊ वाजता सुरू केलेली ही कारवाई दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पथकाने दिली. या मोहिमेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून यात पोलिसांचा फौजफाटा, महापालिकेचे कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. किलेअर्कजवळ पडलेली भंगार वाहने उचलताना काही नागरिकांनी किरकोळ विरोध केला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर हा विरोध मावळला आणि कारवाई सुरळीतपणे सुरू झाली.
जप्त केलेली वाहने पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. याच रस्त्यावरून शहरात येणारे मोठे राजकीय नेते, अधिकारी आणि पर्यटक येतात. आजच्या कारवाईत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी महावीर पाटणी, गायकवाड यांचा या पथकात समावेश होता.
प्रतिमा बदलण्यास सुरुवात
शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस अायुक्त अमितेशकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयानेदेखील या मोहिमेत सहभाग नोंदवला. गेल्या आठ दिवसांत शहरातील अडीच हजार रिक्षांवर कारवाई करण्यात आली. काळ्यापिवळी टॅक्सींना शहराच्या बाहेर थांबा ठेवण्यात आला. याशिवाय मुकुंदवाडी, गजानन महाराज मंदिर येथील भाजी मंडी हटवून वाहतुकीची कोंडी फोडण्यात आली.
पर्यटन शहर म्हणून या शहराची ओळख व्हावी आणि वाहतुकीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे शहराची प्रतिमा बदलण्यास सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. या मोहिमेत हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...