आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Anniversary Day Issue At Aurangabad, Divya Marathi

‘दिव्य मराठी’च्या वर्धापनदिनी स्नेहीजनांचा गोतावळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राजकारणाच्या मैदानात एकमेकांवर आक्रमक हल्ले करणारी मंडळी एकाच टेबलवर बसून निवांत गप्पांमध्ये रंगली होती. साहित्यिक, उद्योजक आपापल्या विश्वातील घटना, घडामोडींची देवाण-घेवाण करत होते. नोकरदार मंडळी सुखद आठवणींना उजाळा देत होती. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासारखे हे दृश्य होते ‘दिव्य मराठी’च्या तिसर्‍या वर्धापन दिनाचे.
औरंगाबादेतील लाखो वाचकांच्या हृदयामध्ये अल्पावधीत स्थान मिळवणार्‍या दैनिक ‘दिव्य मराठी’चा तिसरा वर्धापन दिन गुरुवारी (29 मे) उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात स्नेहीजनांचा गोतावळाच जमला होता. आइस्क्रीम, चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत अनेकांनी गप्पांची जोरदार मैफल रंगवली होती. वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाचक, हितचिंतकांसोबत विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्याची परंपरा आहेच. मात्र, केवळ चहापान आणि भेटीगाठीपुरते त्याचे स्वरूप र्मयादित न ठेवता सर्वांना मनमोकळ्या प्रसन्न वातावरणाचा अनुभव देण्याची खासियत जपली आहे. त्यानुसार सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळील ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयासमोरील भव्य प्रांगणात सुरेख बैठक व्यवस्था करण्यात आली होती. वीस गोलाकार टेबल आणि त्यासोबत खुच्र्या अशी त्याची रचना होती. त्यामुळे प्रत्येक स्नेहीजनाला इतरांसोबत निवांतपणे, मनमोकळे बोलण्याची संधी मिळाली.

सायंकाळी सहापासूनच ओघ सुरू : गुरुवारी दुपारी पावसाळी वातावरण तयार झाले होते. सायंकाळी हमखास सरी कोसळणार, अशीही शक्यता होती. परंतु वरुणराजाने कृपा केली. पावसाच्या सरींऐवजी ‘दिव्य मराठी’वर प्रेम करणार्‍या वाचकांकडून पुष्पगुच्छ, शुभेच्छांच्या सरींचा वर्षाव झाला. सायंकाळी सहा वाजेपासूनच स्नेहीजनांच्या आगमनास सुरुवात झाली होती. प्रत्येक जण जणू काही एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी आला असेच वाटत होते. कोणी सोबत पुष्पगुच्छ, कुणी शुभेच्छापत्रे तर कुणी रेखाटने, चित्रकृती आणल्या होत्या. सोबत ‘दिव्य मराठी’चे तोंडभरून, मन:पूर्वक कौतुकही सुरू होते. रात्री पावणेअकरा वाजेपर्यंत वाचक, मान्यवरांचे या मैफलीत आगमन होत होते.

विविध क्षेत्रांतील मान्यवर : राजकारण, प्रशासन, विधी, साहित्य, धर्मकारण, उद्योग, व्यापार, पोलिस, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्यात हजेरी लावली. त्यात प्रामुख्याने शांतीगिरी महाराज, महापौर कला ओझा, खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, उपमहापौर संजय जोशी, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, प्रशांत बंब, माजी आमदार किशनचंद तनवाणी, नामदेव पवार, पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, अजित मुळे, प्रा. रामदास गायकवाड, प्रख्यात गायक प्रा. राजेश सरकटे, व्यापारी महासंघाचे अजय शहा, प्रफुल्ल मालाणी, मदनभाई जालनावाला, साहित्यिक बाबा भांड, डॉ. ऋषिकेश कांबळे आदींचा समावेश होता.

शब्दसुरांनी आली रंगत
स्नेहीजनांच्या मनोरंजनासाठी एबी इव्हेंट्सचे भरत भालेराव आणि त्यांच्या सहकार्‍यांचा गीत-संगीताचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. त्यातील कलावंतांनी अनेक नवी-जुनी मराठी तसेच हिंदी गीते सादर केली. त्यांच्या शब्दसुरांनी वर्धापन दिन सोहळ्यात आणखीनच रंगत आली होती.

राजकारण्यांच्या गप्पा रंगल्या
एरवी राजकीय व्यासपीठांवरून एकमेकांवर आगपाखड करणारी राजकीय मंडळी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र आली होती. ‘दिव्य मराठी’च्या सोहळ्यात त्यांच्याही गप्पांचा फड रंगला. खासदार चंद्रकांत खैरे, राजू वैद्य, विकास जैन, बंडू ओक, किशोर नागरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विनोद पाटील, किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल अशी अनेक मंडळी गप्पांमध्ये रंगली होती.