आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीच्या पतंगोत्सवात दिग्गजांचा सहभाग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राजकारणाच्या मैदानावर एकमेकांचे पतंग कापणारे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर अनिता घोडेले यांनी आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने ख-याखु-या पतंगबाजीत ‘कापाकापी’चा आनंद लुटला. वैद्यकीय, उद्योग, बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवरही वय आणि थकवा विसरून ओ काट ...ओ मार..करीत पतंगोत्सवात दिलखुलास बागडले. निमित्त होते ‘दिव्य मराठी’ने औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आयोजित केलेल्या पतंगोत्सवाचे.
एन-2 सिडको परिसरातील एडीसीएचे मैदान रंगीबेरंगी पतंगांनी आज अक्षरश: फुलून गेले होते. निळ्या आसमंतात लाल, पिवळ्या, काळ्या, भगव्या, बदामी रंगाच्या पतंगांच्या छटा उमटल्या होत्या. सकाळी दहा वाजता या आगळ्यावेगळ्या महोत्सवास सुरुवात झाली. आमदार जैस्वाल सोबत भगव्या रंगाचे पतंग, चक्री व बरेलीचा मांजा घेऊन आले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेंद्र साळुंके, काँग्रसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम यांनी एकच पतंग उडवत इतरांचे दोन पतंग कापले होते. जैस्वालांचा पतंग पहिल्या प्रयत्नात वा-याने फाटला. तेव्हा अक्रम यांनी ‘भैया भगवा रंग तुमच्या पचनी पडत नाही’ अशी टिप्पणी केली. मग जैस्वालांनी मेणबत्तीच्या आकाराचे चित्र असलेल्या खलमी रंगाच्या पतंगाची कन्नी बांधली. सर्वांत उंच पतंग चढवत, घिसीट मारून त्यांनी साळुंकेंचा पतंग कापला.
आमदार किशनचंद तनवाणी पतंगोत्सवात सहभागी होण्यासाठी मैदानावर आल्यानंतर हवा पूर्व -पश्चिम वाहत होती. नंतर हवेची दिशा बदलली. त्यावर कोटी करीत तनवाणी यांनी राजकारणाप्रमाणे हवा बदलत चालली आहे, असे म्हणत पतंगबाजीचा मनसोक्त आनंद लुटला. महापौर घोडेलेही यात मागे राहिल्या नाही. त्यांनीही अस्सल पतंगबाजाप्रमाणे पतंग उडविले. शिवाय आमदार जैस्वाल यांना वर्षभर गोड बोला, अशी विनंतीही केली. महापौर, जैस्वाल, तनवाणी मैदानाबाहेर पडल्यावर खासदार खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी तेथे आले. त्यांनीही व्याप-ताप विसरत पतंग उडवले.
धकाधकीच्या जीवनात लहान होऊन मौज लुटण्याची संधी पतंगोत्सवाच्या निमित्ताने मिळाली. त्यात गायकवाड कोचिंग क्लासेसचे प्रा. रामदास गायकवाड, प्रोझोनचे अनिल इरावणे, डॉ. अशोक झुनझुनवाला, रणजीपटू अनंत नेरळकर, अर्पित झुनझुनवाला, डॉ. गोपाल नेवनेतकर, डॉ. प्रशांत पाळवदे, राजकुमार जाधव, जितेंद्र खाडे, मुस्लिम विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हारून मलिक, डॉ. दीपक पाठक, प्रख्यात उद्योजक अजित मुळे, सचिन मुळे, बिल्डर देवानंद कोटगिरे, डॉ. राजीव खेडकर, डॉ. आशा साकोळकर, नवीन बगडिया, नितीन बगडिया, सुधाकर दानवे, डॉ. विजय दहिफळे, उज्ज्वला दहिफळे, नंदकुमार घोडेले, दिलीप अग्रहारकर, प्रदीप खडके, डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. आसावरी टाकळकर, डॉ. अजय राजगुरू, विकास बनकर, स्नेहा सूर्यवंशी, सचिन पाटील, डॉ. अरुण देशमुख, संतोष लेणेकर, पंढरी गायकवाड, संजय गाडे, पंकज अग्रवाल आदी बड्या आसामी लहानग्यांच्या उत्साहात जणू लहान बनून सहभागी झाल्या होत्या. या वेळी ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड अलोक वर्मा, मुख्य जाहिरात व्यवस्थापक सुभाष बोंद्रे आदींची उपस्थिती होती.