आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Madhurima Club Aurangabad Cultural Program

महिला रमल्या बालपणीच्या खेळांत; मधुरिमा क्लब सदस्यांचे सामुहिक हळदी-कुंकू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दैनिक दिव्य मराठी मधुरिमा क्लब, गरवारे कम्युनिटी सेंटर व रत्नाकर बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुरिमा उत्सवाचा रविवारी रंगारंग कार्यक्रमांनी समारोप झाला. सदस्यांसाठी हळदी-कुंकवाचे आयोजनही करण्यात आले होते. या वेळी विविध स्पर्धांनी महिलांना बालपणची आठवण करून दिली.

16 जानेवारीपासून सुरू झालेल्या या मधुरिमा उत्सवात विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर रविवारी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना आकर्षण असलेल्या मेंदी, नेल पेंटिंगच्या रचनेद्वारे महिलांचे कार्यक्रमात स्वागत करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

भाग्यर्शी कणसे, पूजा सोनवणे यांनी मेंदी काढली, तर नेल आर्टचे काम अनघा नगरकर यांनी केले. महिलांमधील धमाल करण्याचा आणि गमतीशीर विषय म्हणजे उखाणे. या स्पर्धेत महिलांनी माहेरच्या आठवणी जागवल्या. आजच्या सामाजिक परिस्थितीवर चपखल भाष्य करणारे उखाणेही काही महिलांनी सादर केले.

पारंपरिक वेशभूषा स्पर्धा
नटणे, मुरडणे हा सर्वच महिलांचा छंद असतो. त्यामुळेच पारंपरिक वेशभूषा स्पर्धेला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला. महिलांनी महाराष्ट्रीयन नऊवारी साडी, कोळी, बंजारा, नववधू, शेतकरी, गृहिणी, सोनपरी, इंडो-वेस्टर्न अशा विविध वेशभूषा क रून वेगळेपणाने स्पर्धेची रंगत वाढवली.

केशरचना स्पर्धा
केशरचना स्पर्धेमध्ये महिलांनी सागर वेणी-जुडा, पार्टी वेअर, ब्राइडल हेअरस्टाइल, माँगोबन, शॉट हेअर, पिंचरोल अशा विविध प्रकारच्या केशरचना सादर केल्या.

दोरीवरच्या उड्या
या स्पर्धेत महिलांनी बालपणीच्या आठवणी जागवल्या. माहेरच्या आठवणी सांगत महिलांनी दोरीवरच्या उड्यांचा मनमुराद आनंद घेतला. कोणी एका पायावर, तर कोणी दोन्ही पायांवर उड्या मारत होते.

टायर रनिंग
टायर रनिंग स्पर्धेत महिलांनी अनेक वर्षांनंतर तर काहींनी प्रथमच या खेळाचा आनंद लुटला. काही महिला शेवटपर्यंत पोहोचल्या, तर काहींचे चाक मध्येच थांबले. अनेकींचे टायर एकमेकींमध्ये अडकल्यानेहास्यकल्लोळ निर्माण झाला.

बेस्ट मिस मॅच
या स्पर्धेने संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणली. नेहमी मॅचिंगसाठी झगडणार्‍या महिला या स्पर्धेसाठी मात्र अधिकाधिक मिस मॅच दिसण्याचा प्रयत्न करत होत्या. पायातील चप्पल, विविध प्रकारांतील जिन्स-शर्ट टॉप, एका हातात बांगड्या, तर दुसर्‍या हातात ब्रेस्लेट, पारंपरिक दागिन्यांबरोबरच आधुनिक दागिने असे विविध प्रकार करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

स्पर्धांचे परीक्षण मीना पाटील, सुलभा जोशी, शोभा पाटील यांनी केले. कार्यक्रमास रत्नाकर बँकेचे शाखा व्यवस्थापक रविराज सतनूर, प्रसाद पाठक, सफल साळुंके, नीलेश सोनुने, सुनील खानापूरकर गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, शिल्पा कुलकर्णी, वसंत वाणी, जगदीश भिडेवाल, व्ही. बी. तुपे, एस. आर. राठोड, राजेंद्र यादव, यू. एस. पाटील, स्मिता नगरकर, अश्विनी कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

स्पर्धेत विजेत्या-
पारंपरिक वेशभूषा - राजश्री चव्हाण
केशभूषा - माधवी सुरनाळे
मिस मॅच- अल्पना कटारिया


स्टॉलचे महिलांना आकर्षण
अगरबत्ती, मेणबत्ती, लग्नासराईच्या निमित्ताने थर्माकोलचे विविध रुखवताचे सामान, मखर, मंदिर, सिंहासन, पंजाबी ड्रेस, कुर्ती-लेंगीस, दुपट्टा, स्टिचिंग ब्लाऊज, इमिटेशन ज्वेलरी, वनौषधींयुक्त अशा विविध सौंदर्य प्रसाधनांबरोबरच खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल येथे लावण्यात आले होते.