आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ने वाचकांना ज्ञानी करावे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 18 व्या नामविस्तारदिनी ‘दिव्य मराठी’ने 14 जानेवारीला ‘नामविस्तार दिन विशेष’ हे विशेष पान प्रसिद्ध केले होते. या उपक्रमाचे वाचकांनी भरभरून स्वागत केले. ‘दिव्य मराठी’ने भविष्यात अशा प्रकारची दुर्मिळ माहिती प्रसिद्ध करून वाचकांना ज्ञानी करावे, अशी अपेक्षा अनेक वाचकांनी व्यक्त केली.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्यासाठी परिवर्तनवादी सतरा वर्षे लढले. विधिमंडळात 1977-78 ला ठराव मंजूर होऊनही नामविस्तारासाठी 14 जानेवारी 1994 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. या घटनेलाही सतरा वर्षे झाली. याप्रीत्यर्थ ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी खास ‘नामविस्तार दिन विशेष’ पान प्रसिद्ध करून इतिहासाची पाने उलगडण्याचा प्रयत्न केला.
दूरध्वनी करून ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे यांना आणि संबंधित बातमीदारास असंख्य वाचकांनी प्रस्तुती आवडल्याचे म्हटले, तर दिवसभर कार्यालयाचेही फोन खणखणत होते. काहींनी एसएमएसने प्रतिक्रिया नोंदवल्या. माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे आणि नामविस्ताराची सर्वप्रथम मागणी करणारे प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनाही सादरीकरण आवडले.
प्रा. मंजूषा लांडगे यांनी सतरा वर्षांच्या चळवळीची सर्वाेत्तम माहिती वाचकांना दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. रमेश जाधव यांनाही संकलन भावले. वैजापूर तालुक्यातील शिऊरचे संजय पगारे यांनी प्रत्येक दिनविशेषानिमित्त याच पद्धतीने मजकूर प्रसिद्ध करण्याचे सुचवले.
पैठण तालुक्यातील नांदरचे दिगंबर सोनवणे या युवकाला नामविस्ताराच्या चळवळीत दलितेतरांचा सहभाग होता हे माहीत नव्हते, पण नेत्यांच्या प्रतिक्रियांतून ही माहिती मिळाल्याचे म्हटले. मधुकर खिल्लारेंनी कार्यकर्त्यांसाठी देखील हा मजकूर दुर्मिळ असल्याचे म्हटले आहे. जालन्याचे पत्रकार सुबोध जाधव यांनी धन्यवाद दिले, तर भोकरदन तालुक्यातील प्रदीप जोगदंडे यांनीही आभार व्यक्त केले. पाचोडच्या कोळी बोडखा येथील सिद्धार्थ वाहुळे यांनी एसएमएस करून अप्रतिम सादरीकरण झाल्याचे म्हटले असून अंक संग्रही ठेवणार असल्याचे म्हटले आहे. प्रेम खडकीकर, भीमराव शेरे, महेंद्र पंचांगे, प्रा. डॉ. अरविंद धाबे, माणिक साळवे यांनी तसेच अनेकांनी कार्यालयाच्या ई-मेलवरही आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.