आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’तर्फे लघु चित्रफीत स्पर्धेचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लघु चित्रफितीच्या (शार्ट फिल्म) निर्मितीतील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे स्पर्धा आयोजित करण्यात येत अाहे. त्यासाठी तीन विषयांवरील लघु चित्रफितींच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. सर्वोत्कृष्ट लघु चित्रफितींना पारितोषिक देण्यात येतील.

गेल्या काही वर्षांत चित्रफीत तयार करण्याचे तंत्र सोपे झाल्यापासून तरुण पिढीतील अनेक कलावंत वेगवेगळ्या विषयांवर चित्रिफिती तयार करीत आहेत. विशेषत: महाविद्यालयीन तरुण, तरुणी यात आघाडीवर आहेत. अनेकविध सामाजिक विषयांना ते वाचा फोडत आहेत. त्यांच्या या कलाकृतींना प्रोत्साहन आणि दिशा मिळावी यासाठी ‘दिव्य मराठी’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त लघु चित्रफीत स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यासाठी (१) जिद्द करा, दुनिया बदला, (२) सकारात्मक जगा ( नो निगेटिव्ह लाइफ ) आणि (३) कॅरिबॅगला नाही म्हणा हे तीन विषय या स्पर्धेसाठी आहेत.

मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या पैकी कोणत्याही भाषेतील लघु चित्रफीत स्वीकारली जाईल. स्पर्धेसाठी पाठवलेली लघु चित्रफीत जास्तीत जास्त १५ मिनिटांची असावी. एका डीव्हीडीवर एक चित्रफीत अशा प्रकारे प्रवेशिका पाठवावी. विषयाची मांडणी, चित्रीकरण, संपादन, प्रकाश योजना आणि एकूण प्रभाव यांचा विचार करून पारितोषिकासाठी निवड करण्यात येणार आहे. मात्र, प्रक्षोभक आणि अश्लील दृष्य, संवाद चित्रफितीत असू नयेत. ते असेल तर प्रवेशिका स्पर्धेसाठी अपात्र ठरेल. प्रवेशिका दिग्दर्शकाच्या नावानेच पाठवावी. स्पर्धेसाठी प्रवेशिका पात्र ठरविण्याचा निर्णय निवड समितीचा आणि पारितोषिकासाठी चित्रफीत निवडण्याचा अधिकार परीक्षकांचा राहील आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल, असे संयाेजकांनी सांगितले.

इथे पाठवा प्रवेशिका
अापल्या प्रवेशिका दिव्य मराठी कार्यालय, मोतीवाला काम्प्लेक्स, जालना रोड, औरंगाबाद या पत्त्यावर १० मे २०१६ पर्यंत स्वीकारल्या जातील. चित्रफितीच्या डीव्हीडीसह दिग्दर्शकाचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि थोडक्यात परिचयही पाठवावा. स्पर्धेचा निकाल जाहीर होऊन पारितोषिक वितरण मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होईल. त्याची तारीख स्वतंत्रपणे ‘दिव्य मराठी’तून जाहीर करण्यात येईल.