आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : अंदाज चुकला : भाव गडगडल्याने साठेबाजी घाऊक व्यापाऱ्यांच्या मुळावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन वर्षांपूर्वी तूरडाळीसह अन्य डाळी आणि काही धान्याचे भाव कडाडले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यात ते कमी झाले. पण पुढच्या उन्हाळ्यात ते पुन्हा तितकेच वाढतील या अपेक्षेने मोंढ्यातील अनेक घाऊक व्यापाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात डाळी आणि धान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली. प्रत्यक्षात दर तेवढे वाढलेच नाहीत; किंबहुना व्यापाऱ्यांच्या खरेदी किमतीपेक्षाही काही दर कमीच राहिले. त्यामुळे व्याजाने पैसे घेऊन केलेली साठेबाजी अनेक व्यापाऱ्यांच्या अंगलट आली असून हा वर्ग प्रचंड तणावाखाली आहे. 
 
शहरातील एका व्यापाऱ्याने तीन महिन्यांपूर्वी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्या घटनेचा पाठपुरावा करत असताना व्यापाऱ्यांचे हे कर्जबाजारीपण आणि त्याचे कारण ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीसमोर आले. मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार साठेबाजी हा कार्यपद्धतीचा भाग आहे. ती नेमकी किती आणि केव्हा करावी, याचे आडाखे बांधलेले असतात. मात्र, यंदा अनेकांचे आडाखे चुकले आणि मोठा आर्थिक फटका त्यांना बसला. 
 
२०१५ मध्ये तूरडाळीचा भाव १८० रुपये किलोपर्यंत गेला होता. २०१७ मध्ये तो कमीत कमी ९० ते १०० रुपये राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. म्हणून त्यांनी व्याजाने रक्कम घेऊन शेतकऱ्यांकडून ७० रुपये भावाने मोठ्या प्रमाणात दाळ खरेदी करून ठेवली. प्रत्यक्षात भाव ५२ रुपयांपर्यंत आले आणि व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. हाच प्रकार इतर डाळी आणि धान्यांबाबत झाला. नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटीमुळे व्यापार ठप्प झाल्यासारखाच होता. लग्नसराईत देखील मोठी उलाढाल नसल्याने व्यापारी अडचणीत आले आहेत. 
 
एक व्यापाऱ्याला किमान २० लाख तोटा 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डाळ, तांदूळ, गहू आदींचा ठोक व्यापार करणाऱ्यांकडे किमान २० लाख रुपयांचा साठा असतो. काही जण एकाच वेळी एक कोटी रुपयांचीही खरेदी करतात. गेल्या सहा महिन्यांत डाळींसह काही अन्नधान्याचे भाव ज्या वेगात घसरले तेवढी घसरण गेल्या दहा वर्षांत कधीच झाली नव्हती. त्यामुळे प्रदीर्घ अनुभव असलेल्या अनेकांचे अंदाज सपशेल चुकले. २०० जणांना किमान २० लाख रुपयांचा तोटा झाला आहे. आता कमी दराने माल विकण्याशिवाय त्यांच्यापुढे मार्ग राहिलेला नाही. 
 
कर्ज काढून घेतात माल 
ठोक व्यवसाय करणारे औरंगाबादेतील ५०० व्यापारी राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, जळगाव, अकोला, दिल्ली येथील मिलमधून मोठ्या प्रमाणावर माल विकत घेतात. त्यासाठी बँका किंवा सावकारांकडून दोन ते तीन टक्के व्याजाने कर्ज घेऊन माल खरेदी करतात. 
 
मदतीची आशा 
- व्यापार म्हटलाकी चढ-उतार येणारच. पण यंदाची परिस्थिती केवळ उताराची आहे. कर्जामुळे व्यापाऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. फक्त त्या ते बोलून दाखवत नाहीत. त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
-संजय कांकरिया, अध्यक्ष, मोंढा व्यापारी असोसिएशन 
 
पुढील स्लाइडवर वाचा, अशी झाली भावाची पडझड (भावरुपये/किलो)... 
बातम्या आणखी आहेत...