आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेचा डबा भरण्याचे काम आईचेच, दोन तरुणींचा अभ्यास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शाळेचा डबा भरणे हे आईचेच काम असल्याचे शहरातील तब्बल ८० टक्के नागरिकांना वाटते. या कामात वडिलांचाही सहभाग असू शकतो हे त्यांच्या ध्यानीमनीही नाही. लिंगभेदाबाबत औरंगाबादकरांच्या मतांचे पहिल्यांदाच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली. लिंगभेदाबाबत या आणि अशाच उत्तरांवर रविवारी एका छायाचित्र आणि कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

यानिमित्ताने इक्वल ही शाॅर्टफिल्म दाखवली जाईल आणि काव्यवाचनातूनही लिंगभेदावर प्रकाश टाकला जाणार आहे. जालना राेडवरील हॉटेल क्रीम अँड क्रंचमध्ये या कार्यक्रमात सहभागी होता येईल. 

औरंगाबाद आणि दिल्ली येथे शिकलेल्या स्वस्तिका जाजू आणि मीरा काळे या तरुणींनी शहरातील लिंगभेदाबाबत नागरिकांच्या मतांचा अभ्यास केला. त्यांनी ठिकठिकाणी नागरिकांच्या दोन मिनिटांच्या मुलाखती घेतल्या. त्याचे चित्रीकरण केले. यात ८० टक्के लोकांकडून डबा भरण्याचे काम आई, मॉम किंवा ममा हे उत्तर मिळाले. गुलाबी हा मुलींचा, तर निळा हा मुलांचा रंग असल्याचे ९० टक्के उत्तरदात्यांनी सांगितले. केवळ २० टक्के उत्तरदात्यांनी महिला, पुरुष आणि तृतीयपंथी असे लिंगाचे तीन प्रकार असल्याचे सांगितले. याशिवाय अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचीही उत्तरे या तरूणींनी जाणून घेतली. 

रविवारी प्रदर्शन 
सर्वेक्षणातील निष्कर्षांवर त्यांनी ४७ मिनिटांची ‘इक्वल’ ही शॉर्टफिल्म तयार केली आहे, तर सर्वेक्षणादरम्यान अनेक छायाचित्रेही घेतली आहेत. त्यांचे रविवार, सप्टेंबर रोजी हॉटेल क्रीम अँड क्रंचमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने लिंगभेदाचे आणि लिंगभेद समानतेवर भाष्य करणारे काव्यवाचनही होणार आहे. सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या नताशा झरीन आणि गौरी मिराशी दुपारी १२ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ग्राइंडमास्टरचे सीईओ समीर केळकर उपस्थित राहतील. संध्याकाळी आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत काव्यवाचन होईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मीरा आणि स्वस्तिकाने केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...