आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी सर्वेक्षण: आधी महागाई रोखा, मग अन्न सुरक्षा द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अन्न सुरक्षा विधेयक, भूसंपादनाचा कायदा करून लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होण्यापेक्षा आधी महागाई रोखा, असे औरंगाबादकरांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले आहे. दै. ‘दिव्य मराठी’ने केलेल्या सर्वेक्षणात सर्व स्तरांतील सुमारे 99 टक्के लोकांनी या शब्दांत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. व्होटबँकेवर डोळा ठेवून निर्णय घेण्यापेक्षा सामान्यांना काय वाटते हे आधी जाणून घ्या, असे आवाहन लोकांनी केले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या यूपीए सरकारने अन्नसुरक्षा विधेयक पारीत केले. शिवाय भूसंपादन कायद्यालाही हिरवा कंदील दाखवला. त्यापाठोपाठ पेट्रोलमध्ये 2.35 रुपयांची दरवाढ झाली. एकीकडे सामान्यांचे जीवन सावरण्यासाठी विधेयके मंजूर होत असतानाच इंधनाचे दरही वाढत आहेत. या स्थितीत औरंगाबादकरांना काय महत्वाचे वाटते, हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने सर्वेक्षण केले. त्यात दोन प्रश्नांद्वारे नागरिकांची मते जाणून घेतली. लोकांनी परखडपणे मते मांडली. या योजनांमुळे लोकांचे जीवनमान उंचावेल हा सरकारचा भ्रम आहे. उलट यामुळे महागाई नियंत्रणाबाहेर जाऊन अराजक माजू शकते, असा इशाराही लोकांनी दिला.