आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजाबाजार वॉर्डात तीन महिन्यांत सव्वादोन कोटींची कामे करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील अनेक बडे व्यापारी, उद्योजक, राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची निवासस्थाने असलेल्या राजाबाजार वॉर्डात खड्डेमय रस्ते, कचर्‍याचे ढीग आणि अंधारलेल्या गल्ल्या या प्रमुख समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी येत्या तीन महिन्यांत सव्वादोन कोटी रुपये खर्चाची कामे सुरू होणार आहेत, अशी ग्वाही नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने पथदिवे, पेव्हर ब्लॉक, गटार दुरुस्ती डांबरीकरणाचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहराच्या विकासाचा मार्ग तयार करण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित अभियानाचा उपक्रम रविवारी शहागंजातील बालाजी धर्मशाळेत झाला. त्यात त्यांनी येत्या काळात नेमकी कोणती कामे करणार, याची माहिती नागरिकांना दिली. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता वसंत निकम, रस्ते व इमारत बांधकाम विभागाचे उपअभियंता भागवत फड यांची उपस्थिती होती. सिद्ध म्हणाले, समस्यांची तीव्रता माझ्या लक्षात आली. त्यामुळेच येत्या काळात अनेक विकासकामे करण्याची तयारी मी सुरू केली आहे. रस्ता रुंदीकरण आणि मोबदल्याचा मुद्दा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी संबंधित आहे. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे.

कुंवारफल्लीत नियमित सफाई होईल, यावर लक्ष ठेवणार आहे. याशिवाय संस्थान गणपती मंदिरासमोर सुशोभीकरण, सर्व गल्ल्यांमध्ये पथदिवे, काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक्सची कामे केली जाणार आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीड महिन्यापासून खडी क्रशरचे प्रकल्प बंद असल्याने डांबरीकरण करणे शक्य नव्हते. आता जिल्हाधिकार्‍यांनी खडी क्रशरवरील बंदी उठवल्याने ही कामे मार्गी लागली आहेत, असेही सिद्ध म्हणाले. उपअभियंता निकम यांनी सिद्ध विकासकामांसाठी पाठपुरावा करत असल्याचे आवर्जून नमूद केले. या वेळी शाखा अभियंता शाकेर शेख, दुय्यम आवेक्षक एन. एस. संगेवार यांचीही उपस्थिती होती.