आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कृपेने बाप्पांच्या दरबारात जुगाराचा डाव; 10 रुपयांपासून 10 हजारांपर्यंत बोली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिसांच्या शांतता समितीच्या बैठकीत आमदार अतुल सावे खासदार चंद्रकांत खैरेंनी गणेश मंडळांच्या मंडपातील जुगाराकडे दुर्लक्ष करा, अशी विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीला पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी तेव्हा काहीच उत्तर दिले नव्हते, मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी आमदार- खासदारांच्या विनंतीला मूक संमतीच दिल्याचे चित्र सध्या जागोजागी दिसत आहे.
 
शहरात रोज पोलिसांच्या कृपेनेच बाप्पांच्या दरबारात जुगाराचे डाव रंगत आहेत. १० रुपयांपासून १० हजारांपर्यंत बोली लागत आहे. त्यात रोज किमान ५० लाखांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने सोमवारी रात्री १२ ते या वेळेत अनेक ठिकाणी प्रत्यक्ष ही परिस्थिती अनुभवली. अनेक मंडळे रात्री दुसऱ्या दिवशीचे नियोजन करतात, काही भजन-कीर्तनात मग्न असतात, तर काही मंडळांत जुगाराचे अड्डे रंगतात.
 
काही ठिकाणी मंडळाच्या बाजूच्याच एखाद्या बंद खाेलीत किंवा शटरच्या मागे हा डाव रंगतो. जुन्या शहरात हे प्रमाण कमी आहे. मात्र अनेक मंडळांत सर्रास तिर्रट-फटकी (झन्नामन्ना) सुरू आहे. तिर्रटच्या जमा रकमेतून दहा टक्के तर फटकीसाठी एका तासाला शंभर रुपये मंडळाला मिळतात. अनेक मंडळांनी जुगाऱ्यांसाठी जागेवर खाण्यापिण्याची सोय केली आहे. 
 
काही मंडळे मात्र याला अपवाद 
शहरातीलकाही मोठी गणेश मंडळे याला अपवाद आहेत. जुन्या शहरातील बहुतांश मंडळे दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांचे नियोजन करतात, तर काही मंडळे आवर्जून कीर्तन-भजनाचे कार्यक्रमांचे आयोजन करतात. काही मंडळांत तर रोज सामूहिक भोजन आयोजित केले जाते. काही मंडळांत रोज भंडाऱ्याचे नियोजन असते. 
 
याच ठिकाणी तयार होतात नवे जुगारी 
अनेकतरुणांचे किंवा लहान मुलांचे पालक मुलगा गणपती मंडळात झोपण्यासाठी जातो आहे, यावर विश्वास ठेवून पाठवतात. याच ठिकाणी जुगाराचे डाव रंगतात आणि नवे जुगारी तयार होतात. मला गणपती मंडळातच जुगार समजला आणि तेव्हापासून मी गणपतीत जुगार खेळत असल्याचे एकाने नाव लिहिण्याच्या अटीवर सांगितले. 
 
या भागातील गणेश मंडळांत जुगार चालू 
चिकलठाणा, सुंदरवाडी, छोटा मुरलीधरनगर, मुकुंदवाडी, संजयनगर, शिंदीबन नारेगाव परिसर, सिडको एन-६, देवळाई, टीव्ही सेंटर परिसर, हर्सूल तलाव परिसर, विमानतळ परिसर, गोलवाडी, रांजणगाव, छावणी, जाधववाडी, सुरेवाडी, हर्सूल टी पाॅइंटचा काही भाग, माळीवाडा, जुन्या शहरातील काही मंडळे. 
 
असे रंगतात पत्त्यांचे डाव 
‘दिव्यमराठी’ प्रतिनिधीने रात्री १२ वाजेपासून शहरभर सुरू केलेली पाहणी रात्री वाजेपर्यंत चालली. त्यात अनेक धक्कादायक प्रकार निदर्शनास आले. सहा जणांच्या एक टेबलसाठी मंडळांना ताशी किमान १०० रुपये द्यावे लागतात. ज्या ठिकाणी जुगार सुरू आहे, तेथून दूर कुठे तरी विखुरलेल्या अवस्थेत गाड्या पार्क केल्या जातात. जेथे जुगार सुरू आहे, त्याच्या बाहेर दोन-तीन पंटर नजर ठेवून असतात. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गर्दी किंवा रात्री तीन वाजताही गाड्यांची पार्किंग आहे त्या ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग दिसतच नाही. बहुतांश मंडळांच्या मंडपाच्या आजूबाजूला हा प्रकार सुरू आहे. एका रात्रीत मोठ्या मंडळात किमान ७० ते ७५ हजार, तर छोट्या मंडळांची उलाढाल ३५ हजारांपर्यंत जाते. एका रात्रीत संपूर्ण शहरात किमान ५० लाखांची उलाढाल होते. 
 
दिव्य मराठी स्टिंग 
ज्या गणेश मंडळांच्या मंडपात जुगार सुरू आहे, त्यांची नावे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे उपलब्ध आहेत. परंतु ज्या गणेश मंडळांत जुगार चालतो, त्या मंडळांचे सर्वच पदाधिकारी जुगार खेळत नाहीत, मोजकेच पदाधिकारी यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्या मंडळांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची बदनामी होऊ नये आणि त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाऊ नये म्हणून या मंडळांची नावे प्रसिद्ध करणे आम्ही हेतुत: टाळले आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर...अाशादायक चित्रही.. 
बातम्या आणखी आहेत...