आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Sting: 13 लाख रुपये द्या... दोन दिवसांत ऑर्डर अन् तिसऱ्या दिवशी जॉइनिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी लावून देण्याचे आमिष देणाऱ्या साखळीतील एजंट. - Divya Marathi
नोकरी लावून देण्याचे आमिष देणाऱ्या साखळीतील एजंट.
औरंगाबाद - ‘समाज कल्याण विभागामध्ये २०१४ मध्ये राबवलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. त्या वेळी रिक्त असलेल्या पदांवर आता आम्ही आमच्या लिंकने उमेदवार भरती करत आहोत. तुमचेही काम होईल. तेरा लाख रुपये रेट राहील. फक्त अगोदर काही तरी टोकन अमाऊंट द्यावी लागेल. दोन दिवसांत तुम्हाला ऑर्डर देतो अन् तिसऱ्या दिवशी तुम्हाला रुजूही करून घेतो!’ विश्वास बसणार नाही, अशा थापा मारून तरुणांकडून नोकरीच्या नावाखाली पैसे उकळणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. डीबी स्टारने स्टिंग ऑपरेशन करून यातील एका एजंटचा पर्दाफाश केला. त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने वरील संवाद ऐकवले. हा एकच एजंट नाही, तर असे अनेक जण असल्याचे प्रत्यक्ष विभागात गेल्यावर कळले. 
 
समाजकल्याण विभागात कुठलीही भरती सुरू नाही. मागील दोन वर्षांत साधी जाहिरातदेखील आलेली नाही. तरीही नोकरीला लावून देतो, असे सांगून लाखो रुपये उकळणारे रॅकेट कार्यरत आहे. याबाबत चमूला माहिती मिळाली. त्यानंतर चमूने आपला भाऊ सरकारी नोकरीच्या शोधात असल्याचे सांगून त्या रॅकेटमधील एजंटशी संपर्क केला अन् पुढे त्याने काय थापा मारल्या, पैशांसाठी कसा तगादा लावला, एखाद्या बेरोजगाराचा विश्वास बसेल अशी ऑर्डर कशी तयार केली,याचा हा पर्दाफाश... 
 
अशी आहे मोडस ऑपरेंडी 
ओळखीतल्या व्यक्तींना ‘आपण सरकारी नोकरीचे काम करून देतो,’ अशी बढाई मारणारा हा तरुण आहे. यात एखादा बेरोजगार अथवा सरकारी नोकरीच्या शोधातील उमेदवार गळाला लागला की तो त्याला सर्व खोटी माहिती देणार. यामध्ये पद कुठले असेल, पगार किती मिळेल, किती आणि केव्हा पैसे लागतील, हेही तो सांगतो. अगोदर सर्व शैक्षणिक केवायसी डॉक्युमेंट घेणे, नंतर ऑर्डर दाखवून पैसे घेणे, ही त्याची फसवणुकीची पद्धत आहे. उमेदवार जेव्हा ती ऑर्डर घेऊन दिलेल्या तारखेला रुजू व्हायला जातात, तेव्हा त्यांच्यापुढे रडण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. 
 
ऑर्डर बोगस असल्याचे कळताच तो रडू लागला
 या रॅकेटमधील एका तरुणाने दिलेली ऑर्डर खरी आहे का, याची शहानिशा करण्यासाठी चमूने समाजकल्याण विभाग गाठला. ऑर्डरवर जावक क्रमांक असल्याने रजिस्टरची तपासणी केली असता तो बोगस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले, ‘मागील महिनाभरात येथे तीन तरुण अशा ऑर्डर घेऊन रुजू होण्यासाठी आले होते.
 
येथे आल्यावर त्यांना आमच्याकडे कुठलीच भरती प्रक्रिया सुरू नसून ही ऑर्डर बोगस असल्याचे सांगितले, तेव्हा ते रडायला लागले. त्या प्रत्येक तरुणांना पोलिसांत तक्रार द्यायला सांगितले. मात्र, तसे केल्यास आमचे पैसे बुडतील, आता गोड बोलून त्या पैसे काढावे लागतील, असे सांगून ते तरुण निघून गेले’, असे समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या तीन तरुणांची लुबाडणूक करणारा एजंट कोण होता, हे मात्र कळू शकले नाही. 
 
सहायक आयुक्तांच्या ड्रायव्हरचे नातेवाईकही फसले 
सहायक आयुक्त एस. एस. शेळके यांच्या सरकारी वाहनचालकाच्या एका नातेवाइकालाही या रॅकेटमधील एका तरुणाने फसवले आहे. समाजकल्याणमध्ये नोकरी लावण्यासाठी पैसे दिल्याचे त्या वाहनचालकाला कळताच त्यांनी हा प्रकार शेळके यांच्या कानावर टाकला. यावर शेळके यांनी पैसे देणाऱ्या उमेदवाराला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. मात्र, फसवणूक झालेल्या उमेदवाराने पोलिसांच्या भानगडीपेक्षा गोड बोलून पैसे कसे काढता येतील, याला प्राधान्य दिले. 
 
आज भेट, उद्या ऑर्डर आणि परवा नोकरी 
चमूने या रॅकेटमधील एका तरुणाशी संपर्क साधल्यावर त्याने प्रत्यक्ष येऊन शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेतली. तेरा लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरला. ऑर्डर आल्यानंतर जॉइनिंगपूर्वी अर्धी रक्कम द्यावी लागेल, असे त्याने सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी त्याने एक ऑर्डर आणून दाखवली. ओरिजनल शिक्का असलेली स्वत:कडे ठेवून ऑर्डरची झेरॉक्स चमूच्या हवाली केली आणि पैशांचा तगादा सुरू केला. उद्या जॉइनिंग अाहे, त्यापूर्वी काही तरी रक्कम द्या, अशी मागणी तो वारंवार करू लागला. परंतु, चमूने“आम्ही या ऑर्डरची एकदा खात्री करतो, मग पैसे देऊ, असे सांगितले.’ 
 
 ती ऑर्डर बनावट असल्याचे सांगितले 
अशाच बनावट ऑर्डर घेऊन काही तरुण आमच्या कार्यालयात रुजू होण्यासाठी आले होते. पण, त्यांना ती ऑर्डर बनावट असल्याचे सांगितले. त्यांना पोलिसांत गुन्हा दाखल करा, असा सल्ला दिला होता. मात्र, एकानेही गुन्हा दाखल केला नाही. समाजकल्याण विभागात कुठलीही नोकरभरती सुरू नसून उमेदवारांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. हा प्रकार बेरोजगारांना लुटण्याचाच असावा.
-एस. एस. शेळके, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग 
 
जॉइनिंगच्या दिवशी सांगितले, “रुजू अहवाल मिळेना’ 
ज्या दिवशी जॉइनिंग ठरलेली होती, त्या दिवशी त्याने सकाळीच चमूशी संपर्क साधला आणि समोरच्या व्यक्तीला पैसे पोहोचल्याने तो रुजू अहवाल देण्यास तयार नाही, असे सांगितले. चार-पाच दिवसांत पैशांचे काही तरी करा आणि जॉइन करून घ्या, असे सांगून त्याने त्या दिवशीची वेळ मारून नेली. रुजू होण्याची कथित तारीख टळल्यानंतर पुन्हा आठवडाभराने त्या एजंटने चमूशी संपर्क साधून रुजू अहवाल तयार करण्यासाठी पैसे लागत असल्याचे सांगून पैशांसाठी तगादा लावला. 
 
अनेक तरुण, तरुणी जाळ्यात 
चमूशी प्रत्यक्ष संवाद झालेला हा एकच एजंट नाही, तर यासारखे अनेक जण असून त्यांनी अनेक तरुण-तरुणींना जाळ्यात आेढले आहे. नोकरी लागेल, या आशेने अनेक जण पैसे देत आहेत. चमूच्या भावासाठी जशी ऑर्डर दाखवली होती, तशाच इतर उमेदवारांच्याही ऑर्डर त्याने दाखवल्या होत्या. त्या अन्य दोन उमेदवारांची आणि तुमची जॉइनिंग एकाच दिवशी होईल, असे सांगितले. त्या दोन उमेदवारांनी थोडे पेमेंट केलेले आहे, फक्त तुमचेच बाकी आहे, असे त्याने सांगितले. 
 
 त्या ऑर्डर बोगसच 
डीबीस्टार चमूच्या भावासाठी त्या तरुणाने जी ऑर्डर तयार केली होती, तिची समाजकल्याण कार्यालयात खातरजमा केली असता ती बोगसच असल्याचे निष्पन्न झाले. ऑर्डरवर सहायक आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आहे. मुळात सहायक आयुक्तांना ऑर्डर काढण्याचे अधिकार नसून ते अधिकार केवळ समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांना आहेत. ही बोगसगिरीही या तरुणाने केली. 
 
बातम्या आणखी आहेत...