आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखलख तेजाने न्हाऊन निघाली दिवाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- समृद्धी, संपदा, आनंद, उत्साह आणि तेज घेऊन येणारा दिवाळीचा सण हर्षोल्लासात साजरा झाला. ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांची अनोखी सांस्कृतिक मेजवानी शहरवासीयांना अनुभवता आली. तर, नरक चतुर्दशीच्या निमित्ताने घराघरांत अभ्यंगस्नान झाले. उटणे आणि सुगंधी अत्तराचा सुवास सर्वत्र दरवळत होता. सायंकाळच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करण्यात आले. वाईट गोष्टी, अंधकार जाऊन दीपोत्सवाने सर्वत्र तेज पसरावे आणि अखंड सुख, समृद्धी नांदावी यासाठी सर्वांनी आराधना केली.

अख्खे शहर रोषणाईने सजले होते. शहरातील दुकाने, कार्यालये, घरे झिरमाळ्या आणि रोषणाईने सजवण्यात आली होती. घराघरांवर लावण्यात आलेले आकर्षक आकाशदिवे आणि पणत्यांनी वातावरणात मंगलमय झाले होते. लायटिंगही लक्ष वेधून घेत होती. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि उडवताना निर्माण होणारा धोका लक्षात घेता यंदा फटाक्यांकडे सर्वांचाच कल कमी होता. मात्र तरीही निराळ्या पद्धतीच्या, इजा न पोहोचवणार्‍या पण रोषणाई आणि झगमगाट करणार्‍या फटाक्यांनी रस्ते उजळून निघाले. लक्ष्मीपूजनानंतर कॅनॉट परिसरातील दुकानांसमोर कानठळ्या बसवणारे सुतळी बॉम्ब वाजवण्यात आले.

सकाळपासून फुलविक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली होती. तर वहीपूजन, लक्ष्मीपूजनासाठी झाडू, बोळके, लाह्या अन् बत्ताशांच्या खरेदीलाही वेग आला होता. गजानन महाराज मंदिर चौकात तर दुपारी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. प्रत्येक घरासमोर मनोहारी रांगोळ्या स्वागतासाठी सज्ज होत्या. अनेकांनी दिवाळीनिमित्त टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, वाहन तसेच किचन अप्लायन्सेसची खरेदी केली. सोने खरेदीही मोठय़ा प्रमाणात झाली. चकल्या, करंजी, शेव, चिवडा, लाडू अशा वैविध्यपूर्ण फराळाचा आस्वाद आप्तेष्टांच्या भेटीत सर्वांनी घेतला. याशिवाय शहरातील सर्व मिठाईच्या दुकानांमध्ये बालुशाही, म्हैसूरपाक, बंगाली मिठाई, काजूकतली अशा वैविध्यपूर्ण मिठाईचीही रेलचेल होती. गजानन महाराज मंदिर, टीव्ही सेंटर, रामनगर, मुकुंदवाडी, औरंगपुरा, शिवाजीनगर अशा सर्व वसाहतींतून कपडे आणि इतर वस्तूंची प्रचंड खरेदी झाली.