आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीपूजन, पाडव्याच्या खरेदीचा उत्साह शिगेला; ब्रँडेडकडे कल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळीमुळे ग्राहकांनी फुलून गेलेली बाजारपेठ लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी सज्ज झाली आहे. सराफा बाजारात नेहमीप्रमाणेच झळाळी असून नाण्यापेक्षा तयार दागिने खरेदी करण्याकडे शहरवासीयांचा कल आहे. महागडे एलईडी, वॉशिंग मशीन आणि फ्रिजलाही जोरदार मागणी आहे. भांडी बाजारात लक्ष्मीपूजनासाठी समई तर भाऊबिजेसाठी कुकर, मिक्सरची खरेदी जोरात सुरू आहे. दिवाळीत १००० चारचाकी तर तब्बल हजार दुचाकी खरेदी झाली आहे. 
 
कुर्ता-पायजमा खरेदीकडे कल 
यंदाच्या दिवाळीत पारंपरिक कपड्यांना ग्राहक पसंती देत आहेत. यामुळेच कुर्ता-पायजमाकडे ग्राहकांचा अोढा असल्याचे टिळक पथवरील राजदरबारचे किशोर काल्डा यांनी सांगितले. बाजारात ८०० ते ४००० रुपयांपर्यंतचे कुर्ते-पायजमे उपलब्ध असल्याचे काल्डा म्हणाले. दोन दशकांपूर्वी घातल्या जाणाऱ्या प्रिंटेड शर्टची फॅशन परतली आहे. दिवाळीनिमित्त ४०० ते ४००० रुपयांपर्यंतचे हे शर्ट अधिक विकले जात आहेत. तर कॅज्युअल, फॉर्मल आणि जीन्सला नेहमीप्रमाणेच मागणी आहे. गेल्या शुक्रवारपासून ग्राहकांची गर्दी वाढतच असून लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारात पाय ठेवायलाही जागा नसल्याचे त्यांनी सांगितले. 
 
नाण्यापेक्षा दागिन्यांना पसंती : सोनेखरेदीसाठीच्या नवीन नियमांमुळे ग्राहक धास्तावलेला होता. दागिन्यांंवर पूर्वीचा १.२ टक्के व्हॅट जाऊन टक्के जीएसटी लागलाय. यामुळे संभ्रमित असणारा ग्राहक दसऱ्यापासून दुकानाकडे वळण्यास सुरुवात झाली. धनत्रयोदशीला सराफा बाजारात मोठी गर्दी होती. ग्राहकांनी नवीन नियमांची माहिती घेऊन लक्ष्मीपूजन, पाडव्यासाठी बुकिंग केल्याची माहिती तनिष्कचे व्यवस्थापक कौशिक शहा यांनी दिली. लक्ष्मीपूजनासाठी ग्रॅम ते ६० ग्रॅमच्या नाण्यांना मागणी आहे. मात्र, ग्राहकांचा ओढा तयार दागिन्यांकडे असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
महागड्या एलईडीला मागणी : होमअप्लायन्सेसच्या बाजारात दसऱ्यापासून सुरू झालेली गर्दी अाता वाढली आहे. ग्राहकांची सर्वाधिक मागणी महागड्या एलईडीला असल्याची माहिती सानिया डिस्ट्रिब्युटर्सचे पंकज अग्रवाल यांनी दिली. ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याने ते ३० लाख रुपयांचे एलईडी विकले जात आहेत, तर ३०० लिटरचे डबल डोअर फ्रिज सर्वाधिक विकले जात आहेत. साडेसहा किलोच्या फ्रंट लोडेड वॉशिंग मशीन्सलाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. बजाज फायनान्समुळे झीरो डिपॉझिट, झीरो प्रोसेसिंग फीस आणि झीरो अॅग्रीमेंट चार्जेसमध्ये ग्राहकांना वस्तू मिळत आहेत, तर क्रेडिट कार्डवर १० टक्के कॅशबॅक आणि ईएमआयची सुविधा मिळत अाहे. पूर्वीप्रमाणे आधी बुकिंग मग डिलिव्हरी असा ट्रेंड मागे पडला असून ग्राहक थेट दुकानात येऊन वस्तूची डिलिव्हरी घेऊन जात आहेत. 
 
समई, भेट देण्यासाठी भांड्यांना मागणी दिवाळीत अनेक जण जुनी भांडी काढून नवीन घेतात. पितळी समई खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा ओढा असतो. याच्या खरेदीसाठी दुकानात ग्राहकांनी गर्दी केल्याची माहिती पानदरिबा येथील राजहंस भांडी बाजाराचे संचालक चंपत जैन यांनी दिली. भाऊबीज आणि पाडव्याला भेट म्हणून देण्यासाठी ग्राहक मिक्सर, कुकर विकत घेत आहेत, तर दिवाळीत फराळ करण्यासाठी अंजली कंपनीच्या सोऱ्याला मागणी आहे. लोकांचा कल ब्रँडेड वस्तू घेण्याकडेच आहे. थाेडे अधिक पैसे गेले तरी चालतील, मात्र नंतर त्रास नको, अशी ग्राहकांची भावना असल्याचे जैन यांनी सांगितले. 
 
४००० ते ५००० दुचाकींचा अंदाज 
जीएसटीनंतरदुचाकीच्या किमती कमी झाल्या आहेत. कर्जाच्या आकर्षक योजनाही आहेत. यामुळेच राज ऑटोकडे दिवसाकाठी १०० ते १२५ दुचाकींचे बुकिंग होत असल्याची माहिती संचालक हेमंंत खिंवसरा यांनी दिली. दिवाळीत ५०० ते ६०० गाड्या विकण्याची राज ऑटोची तयारी आहे. कंपनीतर्फे स्कूटरवर ३००० रुपयांचा घसघशीत डिस्काउंट आहे, तर शासकीय कर्मचाऱ्यांना मोटारसायकलवर १५०० रुपयांची सूट आहे. दिवाळीनिमित्त विविध कंपन्यांच्या ४००० ते ५००० गाड्या विकल्या जातील, असा विश्वास खिंवसरा यांनी व्यक्त केला. 
 
९०० ते १००० कार रस्त्यावर 
प्रीमियमकॅटेगरीतील कारची वेटिंग नवीन नाही. मात्र यंदा अल्टो, वॅगनआर यांनाही १५ ते २० दिवसांची वेटिंग आहे. गेल्या १० वर्षांत कार बुकिंगसाठी एवढा उत्साह प्रथमच बघितल्याचे पगारिया ऑटोचे टीम मॅनेजर संजय जोशी यांनी सांगितले. एकट्या पगारिया ऑटोने दिवाळीच्या तीन दिवसांत १५० कारची डिलिव्हरी दिली आहे, तर पाडव्याला १०० कारची डिलिव्हरी होणार असल्याचे जोशी म्हणाले. पाडव्यापर्यंत पगारिया नेक्साच्या १५०, ऑटोमोटिव्ह २००, ऑटोमोटिव्ह नेक्सा १००, रेनॉल्ट १०० तर हुंदाईच्या १५० अन्य मिळून सुमारे १००० ते १२०० चारचाकी विकल्या जातील, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवलाय. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या माॅडेल्सवर डिस्काउंट आणि फायनान्सची सुविधा देण्यात आलीय. 
 
बातम्या आणखी आहेत...