आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नक्षत्रांच्या गाण्यां’नी रंगली पहाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हिंदी आणि मराठी अवीट गोडीच्या सुमधुर गीतांची पाडवा पहाट सोमवारी संत एकनाथ रंगमंदिरात रंगली. ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर आणि रवींद्र साठे यांच्या दज्रेदार आवाजाची अनुभूती घेण्यासाठी पहाटे 5.30 वाजताच रंगमंदिर रसिकांच्या अलोट गर्दीने फुलून गेले होते.

आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘प्रभाती मनी रंगती’ या गीताने उत्तरा केळकर यांनी तर ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गीताने रवींद्र साठे यांनी मैफलीची सुरुवात केली. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी स्वरमंचावर खुमासदार किस्से आणि विनोदांची हळुवार झालर विणत विविध घडामोडींना उजाळा दिला. अशिक्षित असूनही संसाराच्या विविध प्रश्नांवर मार्मिक टिप्पणी करणार्‍या बहिणाबाईंच्या ‘अरे खोप्यामंदी खोपा’ गाण्याने केळकर यांनी मैफल पुढे गुंफली. चार रागांचा मिलाफ असलेल्या सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘जीवलगा कधी रे येशील तू’ व ज्येष्ठ संगीतकार, गायक गजानन वाटवे यांची ‘मोहुनिया तुजसंगे’ ही रचना सादर करण्यात आली. गाडगीळांच्या बटव्यातून येणार्‍या पुणेरी गप्पा प्रेक्षकांना गुंतवून ठेवत होत्या. यानंतर ‘झाला महार पंढरीनाथ’ या गाण्याने भक्तिरस गुंफला, तर र्शीधर फडकेंच्या ‘फुलले रे क्षण माझे फुलले रे’ गाण्यावर केळकरांसह रसिक र्शोत्यांनीही स्वर गुणगुणले आणि ‘वन्स मोअर’ची मागणी केली. वसंत बापट- यशवंत देव जोडीच्या ‘येशील येशील येशील राणी’ गाण्याने रसिकांवर मोहिनी घालत साठेंनी त्या वेळच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी गाडगीळ साठे आणि केळकरांच्या गान प्रवासालाही उलगडत होते. साठे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटातील ‘आम्ही ठाकर ठाकर’ हे गीत सादर केले. र्शीनिवास खळेंच्या ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’ या संस्मरणीय मराठी गीताने सर्वांवर मोहिनी घातली. केळकर यांनी मेलडी सादर केली. ‘डोंगर कपारी ठाकर वाडी’ यानंतर ‘नवरा माझा नवसाचा’तील ‘चला जेजुरीला जाऊ’, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए’ पेश केले. ‘माझे माहेर पंढरी’,‘मी रात टाकली’ आणि ‘गोमू संगतीने’ नंतर ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या भैरवीने सांगता झाली.

6 वाजेपासून रसिक परतले
आमदार सतीश चव्हाण यांच्या पाडवा पहाटचे हे 8 वे वर्ष होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षाची आठवण जागी करताना अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, पहिल्या वर्षी आयोजकांसह 50 प्रेक्षक सभागृहात होते. यंदा मात्र, 6 वाजेनंतर 450 च्या वर रसिकांना जागेअभावी परत फिरावे लागले.