आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्य, नाट्य आणि गायनाने उजळली दिवाळी पहाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश’ या गाण्याने दिवाळी पहाटेचे स्वागत तापडिया नाट्यमंदिरात करण्यात आले. यासह प्रा. योगेश शिरसाट यांनी आपल्या सहकार्‍यांसह पोट धरून हासायला लावणारे स्किट, अप्रतिम नृत्य, प्रख्यात शहनाई वादक कल्याण अपार यांचे वादन आणि प्रा. राजेंद्र ठाकरे यांनी सादर केलेल्या निवडक रचनांनी नाट्यगृहातील प्रेक्षकांना बहारदार कार्यक्रमाची पर्वणी अभ्युदय फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली.

कार्यक्रम सुरू असतानाच गणेश छत्रे या मूर्तिकाराने तयार केलेली शिल्पे आणि ऋषिकेश गवळी यांनी काढलेली व्यंगचित्रे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. सर्व कलांना सामावून घेणारा असल्याने हा आगळा वेगळा कार्यक्रम ठरला. रविवारी (3 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजेपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाने रसिक र्शोत्यांना आणि प्रेक्षकांना बहारदार पर्वणी दिली. कार्यक्रमाची सुरुवात कल्याण अपार यांच्या शहनाई वादनाने झाली. यानंतर वातावरणात स्वरसाज चढविताना प्रा. राजेंद्र ठाकरे यांनी पं. जितेंद्र अभिषेकींच्या रचना सादर केल्या. ‘हरी भजनाविना काळ घालवू नको रे’ या भक्तिरचनेने त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर सुगम आणि चित्रपट गीतांची सुरेल मैफल रंगली. संगीता भावसार यांनी गायनाला सुरुवात करताच, श्रोत्यांनी जोरदार दाद दिली.

यानंतर नृत्य कलावंतांनी रंगमंचाचा ताबा घेतला. जोगवा चित्रपटातील लोकप्रिय गोंधळ गीत ‘लल्लाटी भंडार’ नृत्यगीताने अभूतपूर्व उत्साह संचारला. रवी खोमणे यांनीही बहारदार गायन करत श्रोत्यांची मने जिंकली. प्रा. योगेश शिरसाट यांनी रचलेल्या ‘चकल्या आणि चिमटे’च्या हास्यकल्लोळाने रंगमंच दणाणून सोडला. महेश अचिंतलवार आणि अँड. रमाकांत भालेराव यांची यामध्ये प्रमुख भूमिका होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुबोध जाधव, गणेश घुले, मंगेश निरंतर, दीपक जाधव, त्रिशुल कुलकर्णी, उमेश राऊत, ऋचा शिंदे, मयूर देशपांडे, डॉ.राहुल बढे, डॉ. विशाल घोरपडे, किशोर नरवडे, कृष्णा जाधव, राजेंद्र वाळके, रुपेश मोरे, बाबू स्वामी, कुणाल मोहाडीकर, जयंत लचुरे, प्रथमेश सामंत, ऋषिकेश देशपांडे आणि कुलदीप माने यांनी पर्शिम घेतले.

उजेडाच्या कविताही रंगल्या : या वेळी प्रख्यात कवी प्रा. दासू वैद्य आणि प्रा. रवी कोरडे यांच्या कवितांची मैफलही जमून आली.

निराळा कार्यक्रम देण्याचा प्रयत्न
कार्यक्रम फक्त गायनाचा नाही तर नृत्य आणि नाट्यासह, साहित्य, शिल्प आणि चित्रांचाही असावा, यामध्ये सर्व कलांचा समावेश असावा असा उद्देश होता. स्थानिक कलावंतांची कला यानिमित्ताने सर्वांना अनुभवता यावी असाही मानस होता. प्रत्येक प्रेक्षक आणि र्शोत्याच्या अभिरुचीचा विचार करून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. नीलेश राऊत, अध्यक्ष, अभ्युदय फाउंडेशन

शिंदे आणि शिरसाट यांचा सत्कार
87 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल कवी फ. मुं. शिंदे तर ‘दुनियादारी’ चित्रपटातील लक्षवेधी भूमिका तसेच अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल योगेश शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला.