आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश काळेंच्या ‘सूर निरागस हो’ने उजळली दिवाळी पहाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अवघ्या महाराष्ट्राला आपल्या सिद्ध स्वरांनी वेड लावणारे युवा गायक महेश काळे यांनी शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) आयोजित दिवाळी पहाट स्वरांनी अक्षरश: उजळून टाकली. ‘सूर निरागस हो या गाण्यापासून मनमंदिरा तेजाने उजळून घेई साधका’पर्यंत एकाहून एक सुरेख भजन, भावगीत ऐकण्याची पर्वणी औरंगाबादकरांना मिळाली. अभ्युदय फाउंडेशनच्या वतीने आयोजित दीपोत्सव स्वरमयी दिवाळी पहाटच्या चार वर्षांचा हा नजराणा चिरंतन स्मरणात राहील असा होता. सहा वाजेच्या कार्यक्रमासाठी पहाटे पाचपासूनच एमजीएम परिसरात रसिकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटामुळेप्रत्येक रसिकाच्या मनात स्थान मिळवणाऱ्या महेश काळेंना ऐकण्याची संधी मिळाली.
कल्याण अपार यांच्या मंगलमयी स्वरांनी पहाटेची सुरुवात झाली. राग परमेश्वरी, ‘पायो जी मैने राम रतन धन पायो’ आणि पंडित भीमसेन जोशींच्या ‘माझे माहेर पंढरी’ अशी धून वाजवत त्यांनी वातावरणनिर्मिती केली. ‘नमामी गजाननाने’ त्यांनी सुरुवात केली. ‘सूर निरागस हो’ ही काळजात घुसलेली धून सुरू होताच सभागृहात एकच जल्लोष झाला. सिद्ध स्वरांमध्ये स्वर मिसळत संपूर्ण सभागृह न्हाऊन निघाले. ‘घेई छंद मकरंद’वरही जबरदस्त जल्लोष झाला. यानंतर भजनांचा ताल रंगला. ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’, ‘संतांचिया गावी’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘काटा रुते कुणाला’ यांनी भक्तिरसाची उधळण झाली. ‘मनमंदिरा तेजाने उजळून घेई साधका’ने त्यांनी केलेला शेवट संस्मरणीय ठरला.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नंदकिशोर कागलीवाल, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, गार्डियन डेव्हलपर्सचे विजय जोशी, उद्योगपती सचिन मुळे, गणेश जहागीरदार, सरस्वती भुवन संस्थेचे डॉ. श्रीरंग देशपांडे, अभ्युदयचे अध्यक्ष नीलेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

सौरभ राऊतचा विशेष सत्कार
कुस्तीमध्ये सुवर्णपदक विजेते सौरभ राऊतचा या वेळी सत्कार करण्यात आला. अभ्युदयच्या वतीने सौरभचा वर्षभराचा खर्चही उचलण्यात आला आहे. ३० वर्षांनंतर हे पदक मराठवाड्याच्या पदरी पडले. यासाठी मंगेश निरंतर, सुबोध जाधव, डॉ. संदीप शिसोदे, गणेश घुले, मयूर देशपांडे, दीपक जाधव, बाबू स्वामी, सुहास तेंडुलकर यांनी विशेष सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...