आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील डीजे बंदीमुळे यंदा कोटींचा फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस आयुक्तांनी शहरात लग्न तसेच अन्य मिरवणुकीत डीजे वापरण्यास बंदी घातल्याने शहरातील दोनशेवर डीजेमालकांना किमान कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. मात्र, तूर्तास आम्ही सहकार्य करतोय, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे.

दुसरीकडे वाहने रस्त्यावर उभी केल्यास ती जप्त करण्याबरोबरच मंगल कार्यालयांवरही गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी यातून मंगल कार्यालयांचे मालकच मार्ग काढू शकतात, असे चित्र आहे.

लग्नाच्या वराती तसेच सार्वजनिक मिरवणुकीत ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची वाद्ये वाजवता येणार नाहीत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वीपासूनच ही कारवाई अपेक्षित असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. डीजे संघटनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही डीजे हा ७५ डेसिबल तर सोडाच, अडीचशे डेसिबलच्या खाली वाजूच शकत नाही. त्यामुळे आपोआपच डीजेवर बंदी आली आहे. मात्र, असे असले तरी डेसिबल मोजण्याची पोलिसांची पद्धत अचूक नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे. पोलिसांशी काहीही वाद घालता या निर्णयाची अंमलबजावणी करावी अन् नंतर न्यायालयीन लढाई लढावी, असे ठरले आहे.

एका समारंभात डीजे वाजवण्यासाठी १५ ते २५ हजार रुपये आकारले जातात. काही डीजेचे शुल्क ५० हजार रुपयांपेक्षाही जास्त असते. जेवढा आवाज जास्त तेवढे शुल्क जास्त, असे समीकरण असते. शहरात दोनशेपेक्षाही जास्त डीजे असले तरी अन्य शहरांतूनही डीजे येथे वाजवण्यासाठी आणले जातात. मात्र, आता हे डीजे दिसणार नाहीत.

आकडेवारी अशी
- मंगल कार्यालये लॉनची संख्या- १७०० च्या आसपास (यात शाळा, मैदाने, धार्मिक स्थळे यांचाही समावेश आहे.)
- डीजे धारकांची संख्या- २०० च्या आसपास

एका लग्नसराईची विनंती आयुक्तांनी फेटाळली
डीजेबंदीकरताना एवढी लग्नसराई होऊ द्यावी, नोंदणी झाली आहे, आगाऊ रक्कम घेऊन ठेवली आहे, असा युक्तिवाद संघटनेच्या वतीने पोलिस आयुक्तांकडे करण्यात आला होता; परंतु अमितेशकुमार यांनी तो फेटाळून लावला. एवढी लग्नसराई झाली असती तर किमान कोटी रुपये साउंडचालकांच्या हाती पडले असते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.