आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर 'झिंगाट', करणारा डीजे जप्त, कायद्यात तरतूद नसल्याने कारवाई नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वरातीत लावलेल्या डीजेच्या 'झिंगाटा'मुळे त्रस्त नागरिकांनी तक्रार करताच सिडको पोलिसांनी बुधवारी डीजे जप्त केला. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनीच पुढाकार घेत ही कारवाई केली असून पोलिस उपनिरीक्षक सागर कोते यांनी डीजेचालकाच्या विरोधात फिर्याद दिली. त्यावरून गाडीचालक अतिष वसंत जाधव (रा. आंबेडकरनगर), डीजे ऑपरेटर आकाश प्रकाश अंभोरे (रा. एन-१३), गिरजाराम मारुती पांढरे (रा. एन-१२) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जामिनावर सोडले.

टीव्ही सेंटर परिसरातील कीर्ती मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यासाठी डीजे लावण्यात आला होता. डीजेवर अत्यंत कर्णकर्कश गाणी वाजवली जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी पोलिसांना व्हॉट्सअॅपवर केली. या तक्रारीची दखल घेत पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन डीजे जप्त करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मुंबई पोलिस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशाने जप्त केलेली डीजेची गाडी परत देण्यात आली. तथापि, आरोपींवर पुढील कारवाई करण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याचे प्रजापती यांनी सांगितले. पुढील तपास उपनिरीक्षक कोते करीत आहेत.

ग्राहकांवर कारवाई करण्याची तरतूद नाही : ज्याग्राहकांनी डीजे चालकाला बोलवले त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र ध्वनी प्रदूषणाविषयीच्या कुठल्याही तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. यासंबंधी पोलिस अधिकाऱ्यांच्या ई-मेलवरही तक्रार करण्याची सोय उपलब्ध आहे. गल्लीत होणारे वाढदिवस, हळदीच्या कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत डीजे वाजवला जातो. याचीही आता दखल घेतली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

डीजे व्यावसायिकालाही घ्यावी लागते परवानगी
कुठल्याही समारंभासाठी साउंड सिस्टिम लावायची असल्यास डीजेचालक किंवा मंडपवाल्यांना परवानगी घ्यावी लागते. यासंदर्भातील कारवाई चालकावरच होते. रहिवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक असे तीन झोन तयार करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी आवाजाच्या डेसिबलची क्षमता वेगवेगळी आहे. - अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे , विधिज्ञ

परवाना नाही
पोलिस खास डीजेला परवानगी देत नाहीत. कोणत्याही समारंभात कोणतेही वाद्य (डीजेसह) वाजवायचेअसेल तर त्यासाठी ५५ डेसिबलची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक आवाज असल्यास कारवाई केली जाईल याची मंगल कार्यालय चालक, डीजे व्यावसायिक नागरिकांनी नोंद घ्यावी. - कैलास प्रजापती, पोलिस निरीक्षक, सिडको
बातम्या आणखी आहेत...