आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"डीएमआयसी'चे काम सुरू, शापूरजी पालनजी कंपनीनेही थाटले ऑफिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिल्ली-मुंबईकॉरिडॉर अर्थात डीएमआयसीच्या पायाभूत कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली अाहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या शेवटच्या कोपऱ्यापासून पुढील आठशे हेक्टर पट्ट्यात काम सुरू झाले आहे. अमेरिकेतील सीएचटूएम कंपनीच्या मार्गदर्शनाखाली भारतातील बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य कंपनी शापूरजी पालनजी कंपनी हे काम तडीस नेणार आहे. पहिल्या टप्प्यात जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून पुढे रस्ते पुलांचे बांंधकाम होणार आहे. आगामी तीन वर्षांत म्हणजे २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य या कंपन्यांना देण्यात आले आहे.
गेले वर्षभर डीएमआयसीची फक्त चर्चाच ऐकिवात होती. प्रथम केंद्र सरकारच्या पातळीवरून ही योजना राज्य सरकारकडे देण्यात आली. या डीएमअायसीतील बांधकामांचे कंत्राट शापूरजी पालनजी अँड कंपनी या संस्थेला मिळाले. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने सीएचटूएम या कंपनीची निवड करण्यात आली. ही कंपनी या सर्व कामांचे प्रकल्प व्यवस्थापन करणार आहे. म्हणजे शापूरजी पालनजी कंपनी प्रत्यक्ष पायाभूत सुविधांचे काम करेल त्यावर सीएचटूएम ही प्रकल्प व्यवस्थापनाचे काम करेल. ही कंपनी एआयसीटीएलला सर्व अहवाल देईल. २२ एप्रिल रोजी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष साइटवर भेट दिली. तेव्हा शेंद्रा उद्योग वसाहतीतूनच डीएमआयसीकडे रस्ता जोडण्यात आल्याचे दिसून आले. येथून पुढे ८०० हेक्टरवर डीएमआयसीची कामे सुरू होणार असल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

काय आहे सीएचटूएम
डीएमआयसीच्या कामाचे कंत्राट जरी शापूरजी पालनजी या भारतातील मोठ्या बांधकाम कंपनीला मिळाले असले तरी अमेरिकेतील सीएचटूएम ही प्रकल्प व्यवस्थापनातील जगातील सर्वात मोठी कंपनी या सर्व कामंावर देखरेख ठेवून सर्व कामांचे व्यवस्थापन करेल. या कंपनीचे अधिकारी डीएमआयसीत डेरेदाखल झाले आहेत. काही काही अनिवासी भारतीयही शहरात तीन वर्षांसाठी आले आहेत. कंपनीचे शहरातील मुख्य कार्यालय चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये आहे. साइटवर तात्पुरत्या स्वरूपाचे परंतु अद्ययावत शेड उभारून ऑफिस उभारण्यात आले आहे. सीएचटूएमच्या शेजारीच शापूरजी पालनजी कंपनीचेही कार्यालय आहे. या ठिकाणी पन्नास ते साठ कर्मचारी तीन वर्षांसाठी शहरात आले आहेत. तीन वर्षांत सीएचटूएम शेंद्रा भागातील डीएमआयसीचे काम तडीस नेण्याची अपेक्षा आहे.

पायाभूत कामांना सुरुवात, पाण्याची गरज नाही
डीएमआयसीच्या पायाभूत कामांना प्राथमिक सुरुवात झाली असून सध्या जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. जून अखेरपासून रस्ते आणि छोट्या पुलांचे काम सुरू होईल. दुष्काळी परिस्थिती असल्याने सध्या या ठिकाणी पाणी लागेल, अशी कोणतीही कामे हाती घेतलेली नाहीत. मात्र, एक दीड महिन्यात कामाला अधिक गती मिळालेली असेल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.