आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळाले त्या खात्याचे नीट काम करा, शिवसेना मंत्र्यांना गिते यांचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात भाजपने सत्तेत वाटा दिला असला तरी कमी दर्जाची खाती दिली, तेथेही भाजपवाले काम करू देत नाहीत, असा आरोप शिवसेना मंत्र्यांकडून वारंवार होतो. कोणतेही मंत्रिपद कमी दर्जाचे नसते. मिळाले त्या खात्याचे काम करून जनतेसमोर गेले पाहिजे. आपण जनतेचे सेवक आहोत, तेव्हा त्या अंगानेच मंत्रिपदाचा विचार व्हावा, असा सल्ला केद्रीय मंत्री अनंत गिते यांनी दिला आहे. दोन दिवसांच्या दौ-यासाठी गिते शुक्रवारी सायंकाळी शहरात आले.

जालना रस्त्यावरील पंचतारांकीत हॉटेलात ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांवरही टीका केली. ते म्हणाले, कोणतेही मंत्रिपद हे कमी किंवा जास्त दर्जाचे नसते. जनतेची कामे करण्यासाठी ही खाती असतात. तेव्हा जे खाते मिळाले तेथे चांगले काम करून दाखवणे हे मंत्र्यांचे काम आहे. उगाच कमी दर्जाचे किंवा चांगल्या दर्जाचे खाते, यावर वाद घालण्यात अर्थ नाही. केंद्रात मला जे खाते मिळाले, तेथे मी चांगले काम करतोय. केंद्रात पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना जास्त काम ठेवले नाही, प्रत्येक कामात हस्तक्षेप असतो ही फक्त चर्चा असून मोदींनी मंत्र्यांना काम करण्याची मुभा दिली आहे. त्यांना मंत्र्यांकडून परिणाम दाखवणारे व्यापक काम हवे असून ते नियोजनबद्ध काम करत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

...त्या पवारांच्याच पुड्या
नरेंद्र मोदी हे शरद पवारांचा सल्ला घेतात, अशी चर्चा असली तरी अशा पुड्या स्वत: पवारच सोडतात, त्यांना तेवढेच काम आहे. पवार पूर्णवेळ राजकारणी आहेत. झोपेतही ते राजकारणाचाच विचार करतात. मोदी सल्ला घेतात, ही त्यातीलच एक पुडी आहे. स्वत:च पुडी सोडायची, मग त्यावर बोलत राहायचे, हा त्यांचा जुना फंडा आहे. मोदींनी त्यांचा सल्ला घेतला असता तर ते कधीच पंतप्रधान झाले नसते, असे गिते म्हणाले.