आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांना कोटीने गंडवणारे दोघे गजाआड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित सीबीपीएल कंपनीकडून अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब मिळवून देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादेतील बाराहून अधिक डॉक्टरांना एक कोटी रुपयांना गंडा घालणा-या व्हाइट कॉलर भामट्यांच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी पुणे येथे गजाआड केले. हे दोघेही उच्चशिक्षित असून एकाचे नाव प्रल्हाद पाटील( बी. ई.) तर दुस-याचे श्रीकांत जाधव(डी. फार्मसी) आहे.
प्रल्हाद संतराम पाटील (44, वसंत कॉलनी, मार्केट यार्ड, सांगली), श्रीकांत शामराव जाधव (38, संभाजी चौक, इचलकरंजी) यांच्यासह पाच जणांची तक्रार औरंगाबादेतील डॉ. अतुल आगटे यांनी केली होती. पोलिसांनी 10 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या टोळीने सर्वप्रथम पन्नालालनगरातील व्यावसायिक अखिल वकील यांना जाळ्यात ओढले. त्यांना सिडको एन-7 येथे पॅथॉलॉजी लॅब उभारण्याचे आमिष दाखवून सहा लाखांनी लुबाडले. डॉ. आगटे यांनी सुनील आणि त्याची पत्नी बेला सेनगुप्ता तसेच मार्केटिंग करणारे प्रल्हाद पाटील, श्रीकांत जाधव आणि व्यवस्थापक उमेश तिवारी यांच्याकडे 27 लाख रुपये दिले होते. पैसे घेतल्यानंतर महिना उलटल्यावरही लॅबची शाखा न मिळाल्याने त्यांनी पुण्यात गुप्ताची भेट घेतली होती. तिथे चौकशी केल्यावर सीबीपीएल कंपनी आणि गुप्ताचा काहीच संबंध नसल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. आगटे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी उमेश तिवारी या भामट्याला अटक केली होती.
सुनील सेनगुप्ता सूत्रधार
टोळीचा मुख्य सूत्रधार सुनील सेनगुप्ता आहे. आदित्य बिर्ला समूहातील कंपनीशी भागीदारी असल्याचे सांगत हा भामटा डॉक्टर आणि व्यापा-यांना अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब उभारण्याचे आमिष दाखवतो. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि साहित्य दिले जाईल, असे सांगत त्याने लाखो रुपये उकळले आहेत. औरंगाबादेत 23 जून ते 27 जुलै 2009 या काळात वतर्मानपत्रात जाहिरात देऊन या टोळीने फिल्डिंग लावली होती.
विदर्भ, प. महाराष्ट्रातही कारनामे
व्हाईट कॉलर टोळीने औरंगाबादेतच नव्हे तर मराठवाड्यातील इतर शहरे, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही अनेक डॉक्टरांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.