आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरच्या रूपात ईश्वर धावला, प्राथमिक उपचारामुळे प्रवाशांचे वाचले प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमींना आपत्कालीन रुग्णवाहिकेतून घाटीत नेणे आणि उपचार करणे हा नेहमीचा अनुभव. परंतु गंभीर जखमींना घटनास्थळावरच प्राथमिक उपचार देऊन रुग्णांचा जीव वाचवण्याच्या घटना तशा तुरळकच. अशीच एक घटना मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता पैठण रोड आणि वाळूज रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रोडवर घडली. भरधाव अॅपेरिक्षा ट्रकवर आदळल्यानंतर प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना थेट घाटीत नेण्याऐवजी १०८ रुग्णवाहिकेतील डॉ. इम्रान पटेल त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींवर घटनास्थळावरच काही मिनिटांत प्राथमिक उपचार केले. डॉक्टरच्या रूपात ईश्वरच आल्याने जीव वाचल्याची प्रतिक्रिया जखमी प्रवाशांनी दिली.

पहाटे पाच वाजता देवगिरी एक्स्प्रेसमधून उतरलेले १२ प्रवासी बजाजनगर येथे जाण्यासाठी एका अॅपेरिक्षात बसले. पैठण रोडवरून वाळूजकडे जाणाऱ्या लिंक रोडवर अॅपेचालकाने रिक्षा भरधाव दामटली. समोर सळईने भरलेला ट्रक पाहून रिक्षावाल्याचे नियंत्रण सुटले आणि तो थेट त्या ट्रकवर जाऊन आदळला. रिक्षा उलटली. रिक्षातील प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडले. कोणी तरी आपत्कालीन रुग्णवाहिका १०८ ला कळवले. अवघ्या १५ मिनिटांत वैद्यकीय अधिकारी डॉ. इम्रान पटेल, चालक कृष्णा घुले आणि सहायक शेख अब्दुल, प्रवीण भिवसने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरील चित्र भांबावून टाकणारे होते. परंतु डगमगता डॉ. पटेल यांनी ज्यांचे डोके फुटले त्यांना बँडेज केले. हाड मोडलेल्यांना रुग्णवाहिकेत टाकले. पाच व्यक्ती गंभीर जखमी होत्या. त्यात दोन महिला, दोन लहान मुले आणि एक पुरुष होता. या पाचही जणांना रुग्णवाहिकेतून घाटीत आणले. घाटीच्या डॉक्टरांनीही प्रयत्नांची शर्थ केली आणि या पाच जणांचे प्राण वाचले. सध्या नऊ जखमींवर उपचार सुरू असून काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

असे आहेत जखमी
रामकिसन मारुती घाडगे (५०), चंद्रभागा रामकिसन घाडगे (४०), अथर्व अंबादास गरड (५), अरविंदकुमार मोहनसिंह (३७), रूपाली विजय पंडितकर (१९), राजेश पंढरीनाथ पंडितकर (४७), पूजा सदाशिव राऊतराय (२३), अंकिता सदाशिव राऊतराय (५) सदाशिव शेषराव राऊतराय (२५), रोहिणी पाटील (४०, सर्व रा. बजाजनगर).

पुढे वाचा, आईकडून मिळाली प्रेरणा