आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टरांच्या हलगर्जीने महिलेचा मृत्यू?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - रांजणगाव शेणपुंजी येथील आशा श्रीकिसन जाधव (३८) यांचा डॉक्टरचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाला, असा आरोप आशा यांचा मुलगा अमोल याने केला आहे. दरम्यान, ऑपरेशननंतर झालेल्या इन्फेक्शनमुळे आशा यांचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्टर्लाइट कंपनीमध्ये काम करणारे कामगार श्रीकिसन रामभाऊ जाधव यांच्या पत्नी आशा यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना २४ जानेवारी रोजी रात्री ‘राज्य कामगार विमा योजना रुग्णालय’(ईएसआयसी) संलग्नित रुग्णालय ‘हयात हॉस्पिटल’मध्ये भरती करण्यात आले. त्यांच्या गर्भपिशवीवर गाठ असल्याचे निदान झाले. ३० जानेवारी रोजी त्यावर ऑपरेशन करण्यात आले. अधिक त्रास झाल्याने सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सोनोग्राफीकरिता शहरातील खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांना घाटीत रवाना करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी सकाळी ७.३० वाजता आशा यांची प्राणज्योत मालवली. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दीपक बडे, सोमनाथ नेमाने, रमेश ताठे, पंडित शिंदे, शरद पाटील या नातेवाइकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, पोलिस निरीक्षक बहुरे यांच्या सांगण्यावरून ते ताब्यात घेतले.

जे माझ्या आईसोबत घडले, ते इतरांसोबत घडू नये
हलगर्जीपणा करणा-यांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. साधारण आजारातून आईचा मृत्यू होईल, असे वाटलेच नव्हते, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या आईचा मृत्यू झाला आहे.
अमोल जाधव, मृत महिलेचा मुलगा

न्याय मिळवून देणार
अशा बेजबाबदार रुग्णालयाशी ईएसआयसी रुग्णालय संलग्न केलेच कसे? यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल. मृत महिलेच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
बुद्धिनाथ बराळ, कामगार नेते

महिला सुस्थितीत होती
यापूर्वी महिलेचे तीन ऑपरेशन झाले होते. ऑपरेशननंतरही ती ८२ तास सुस्थितीमध्ये होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने घाटीत पाठवले.
झाकीर हुसेन सिद्दिकी, व्यवस्थापक, हयात हॉस्पिटल.

ईएसआयसीशी संलग्न रुग्णालय
कामगारांच्या सुविधेकरिता पंढरपूर येथील नेहा हॉस्पिटल, मोरे चौक येथील जीवनज्योत हॉस्पिटल व मोहटादेवी मंदिर परिसरातील हयात हॉस्पिटल ईएसआयसीशी संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे ईएसआयकडून आलेल्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना विनाशुल्क सेवा पुरवण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयांवर आहे. मात्र, संबंधित रुग्णालये रुग्णांकडून शुल्क आकारत असल्याचा आरोप होत आहे. जाधव कुटुंबीयांकडूनही रुग्णवाहिका, सोनोग्राफी आदींचे शुल्क आकारण्यात आले.