आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील श्वानप्रेमींना हवी स्वतंत्र ‘श्वान स्मशानभूमी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आमच्या‘मॅक्स’वर आमचे जिवापाड प्रेम होते. तो जर्मन शेफर्ड जातीचा अतिशय उमदा कुत्रा. तो आमच्या कुटुंबातील सदस्यच होता. १२ वर्षांचे आयुष्य जगल्यानंतर त्याने जगाचा निरोप घेतला तेव्हा तो प्रसंग दु:खद तर होताच. पण त्याहीपेक्षा जास्त दु:ख झाले त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना. त्याच्या विल्हेवाटीसाठी जागाच मिळत नव्हती. तेव्हाच मनात आले या लळा लावणाऱ्या मुक्या प्राण्यांसाठीही हक्काची स्मशानभूमी हवी, अशा शब्दांत उल्कानगरीत गिरीश प्रसाद यांनी भावना व्यक्त केल्या.

अशाच भावना शहरातील शेकडाे श्वानप्रेमींच्या आहेत. जिवापाड प्रेम करणारी ही मुकी जनावरे कुटुंबाचाच एक भाग बनतात. पण ही जनावरे जीवनयात्रा संपवतात, तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कारही सन्मानपूर्वक व्हावेत, अशीच इच्छा प्रत्येक श्वानप्रेमींची असते. याच भावनेतून शहरातील ‘पीपल फॉर अॅनिमल’, श्वानप्रेमी आणि रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रोतर्फे श्वानांसाठीही शहरात एक स्वतंत्र स्मशानभूमी असावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शहरात जातिवंत कुत्री पाळणारी हजारांच्या आसपास आहेत तर रस्त्यावर सापडला, पावसात भिजून आला या कारणांनी पाळली जाणारी १० हजारांच्या घरात श्वान आहेत. एवढी मोठी संख्या असलेल्या श्वानांसाठी अगदी छोटीशी का असेना स्मशानभूमी असावी. त्यात विद्युतदाहिनी असावी. म्हणजे थोड्यावेळात डोळ्यांदेखत शवाची विल्हेवाट लागली ही लोक घरी परतू शकतील. छोटेसे गार्डन असावे तिथे काही क्षण थांबता यावे. -डॉ. अनिल भादेकर, श्वान चिकित्सक

वस्त्यांमुळे जागा उरली नाही
डॉ.अनिल भादेकर म्हणाले, पूर्वी शहरात अनेक मोकळ्या जागा होत्या. जेव्हा जनावरे मृत व्हायची तेव्हा मोकळ्या जागेत त्यांचा अंत्यविधी आटोपणे सहज शक्य व्हायचे. पण आता सर्वत्र वस्ती वाढली. मोकळ्या जागाच उरल्या नाहीत. असल्या तरी परिसरातील नागरिक आक्षेप घेतात. मनपाकडे रीतसर चौकशी केली तर ‘नारेगावला जाऊन टाका’ असे सांगितले जाते असा अनेकांचा अनुभव आहे.

मरणही सन्मानाने असावे : मुक्या प्राण्यांनी लावलेला लळा विसरता येऊ शकत नाही. जेव्हा नारेगावात विल्हेवाट लावण्यास गेलो तेव्हा तिथे कचऱ्याचा ढीग होता. पाच मिनिट थांबणे शक्य नव्हते. शव पुरावे तर कुत्र्यांची टोळकी ते उकरून काढणार आणि जाळावे तर तोपर्यंत तिथे थांबणेच शक्य नव्हते, असा अनुभव एका श्वानपालकाने सांगितला.
बातम्या आणखी आहेत...