आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने खरेदी-विक्रीप्रमाणेच चालतो डॉलरचा व्यवहार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विदेशी मुद्रा विनिमय बाजारात (फॉरेक्स) गुरुवारी डॉलरने रुपयाची यथेच्छ धुलाई केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 60 हा सर्वकालीन नीचांक गाठला. विदेशी चलन महागल्याने विदेशातून येणार्‍या रकमेवर अवलंबून असणार्‍यांच्या हाती आता जास्त रक्कम पडणार आहे. मात्र, सर्वसाधारण बाजारात डॉलरची खरेदी-विक्री सोन्याच्या व्यवहाराप्रमाणे असते. डॉलर विकत घ्यायचा असेल, तर जास्त किंमत मोजावी लागते आणि विकायचा असेल तर कमी रुपये पदरी पडतात.

यासंदर्भात आनंद राठी ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ बोदाडे यांनी सांगितले की, साधारणपणे रोज दुपारी 12.30 वाजता विदेशी चलनांचा दर जाहीर होतो. याला आरबीआय रेफरन्स रेट असे म्हणते. हाच रेट व्यवहार करणार्‍या प्रत्येक फर्मसाठी एक्स्चेंज रेट असतो. याउलट वायदा बाजारात (फ्यूचर ट्रेडिंग) मागणी व पुरवठय़ानुसार दर ठरत असतो. सामान्य व्यवहार मात्र एक्स्चेंज रेटनुसार चालतात.

गुरुवारचा एक्स्चेंज रेट डॉलरमागे 59.70 रुपये असा आहे, तर वायदा बाजारासाठी हाच दर 59.80 रुपये असा आहे. प्रत्यक्ष डॉलर घ्यायचा असेल तर 60.65 रुपये लागतील. जर एखाद्याला डॉलर विकायचा असेल तर त्याला त्यापोटी 58.95 रुपये मिळतील. कंट्री एक्स्चेंर्जसचे व्यवस्थापकीय शुल्क, कमिशन, ब्रोकरेज आदींमुळे हा फरक पडतो. थोडक्यात आपण ज्याप्रमाणे सोने खरेदी-विक्री करतो त्याप्रमाणेच डॉलर एक्स्चेंजचा व्यवहार चालतो.

सोने खरेदीसाठी जास्त पैसे द्यावे लागतात, तर जेव्हा आपण सोने विकतो तेव्हा फूट, तूट व घट वगळून सराफ त्याची किंमत ठरवतो, ती खरेदीपेक्षा नक्कीच कमी असते. तसेच डॉलर खरेदी-विक्रीचे आहे. फॉरेक्समध्ये किती कमिशन अथवा ब्रोकरेज असावे याचे निश्चित प्रमाण नसले तरी ते 2.5 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असा संकेत आहे.

महागाई वाढणार
रुपयाच्या अवमूल्यनाचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतात. आयात महागल्याने पेट्रोल-डिझेल महागते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह महागाई वाढते. विश्वनाथ बोदाडे, वरिष्ठ व्यवस्थापक, आनंद राठी शेअर ब्रोकर्स