आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामच्या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण, औरंगाबाद आणि मुंबईत झाल्या शस्त्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ब्रेनडेड राम मगर या तरुणाच्या अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचे वृत्त आहे. औरंगाबादेतील सेठ नंदलाल धूत व मुंबईतील जसलोक रुग्णालयातील रुग्णांवर रामच्या किडन्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. मुंबईच्याच ग्लोबल रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण झाले आहे. किडनी प्रत्यारोपणाच्या दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असून यकृताचा रुग्णही स्थिर आहे.

बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव मही येथील राम मगर (२४) बी.एस्सी. अॅग्री झाल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी अकोला येथे गेला होता. परतताना दुचाकी दुभाजकावर धडकून जखमी झाला होता. त्याला औरंगाबादेतील एमआयटी व सिग्मा रुग्णालयात त्याला हलवले होते. रामच्या अवयवांचे प्रत्यारोपण करून इतर रुग्णांना जीवदान देण्याची तयारी त्याच्या आई मंदाबाई यांनी दाखवली. त्यानुसार शुक्रवारी पहाटे सिग्मा रुग्णालयात त्याचे अवयव काढून तत्काळ विमानाने मुंबईला पाठवण्यात आले. रामच्या एका किडनीचे प्रत्यारोपण धूत रुग्णालयातील रुग्णावर करण्यात आले.

मुंबईत किडनी, यकृत
मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात ७.४५ वाजता यकृत प्रत्यारोपण सुरू झाले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली; पण रुग्ण पूर्णपणे स्थिर झाला किंवा नाही हे समजण्यासाठी ३० वाट पाहावी लागते, असे समन्वयक मुश्ताक खान यांनी सांगितले.

‘धूत’मध्ये किडनी प्रत्याराेपण
धूतमधील रुग्णावर पहाटे ५.३० वाजता किडनी प्रत्यारोपण सुरू झाले. ते ९ वाजता संपले. रात्री १.३० वाजता धूतच्या डाॅक्टरांची टीम ‘सिग्मा’मध्ये पोहोचली. पहाटे ४.५० वाजेपर्यंत शस्त्रक्रिया चालली. रवींद्र भट्टू, विजय बोरगावकर, देवदत्त पळणीटकर, अभय महाजन व वैशाली देशपांडे या डाॅक्टर चमूने प्रयत्न केले. रुग्ण पूर्णपणे बरा असल्याचे डॉ. भट्टू यांनी सांगितले.