आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सत्तार, झांबडांचे डोणगावकरांना संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे सदस्य संभाजी डोणगावकर सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असले तरी मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर ते यातून मुक्त होतील, असे संकेत मिळत आहेत. ‘दिव्य मराठी’ने या प्रकरणाचा कानोसा घेतला असता काँग्रेस आमदार तथा जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार सुभाष झांबड हे दोघेही डोणगावकर यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
थेट दोन आमदारांनी पाठराखण केल्याने डोणगावकर यांच्याविषयी निर्णय घेताना सर्वसाधारण सभेत त्यांना ‘क्लीन चिट’ मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद होतच असतात. ते फारसे ताणण्यात दोघांचेही भले नसते. शेवटी आपल्याला विकासकामे करायची असतात. वादात कामे थांबू नयेत म्हणून प्रकरण मिटवलेले अधिक चांगले, असे या आमदारद्वयींनी खासगीत बोलताना सांगितले. ‘वादावादी ठीक आहे, परंतु थेट मारहाण होते तरीही प्रकरण कसे मिटेल?’ या प्रश्नावर एका हाताने टाळी वाजत नसते. डोणगावकर असेल किंवा बेदमुथा यांचे वैयक्तिक वाद नाहीत. कोणते काम त्यांनी मुद्दाम थांबवले, का थांबवले याचीही चौकशी व्हायला हवी, असा त्यांचा युक्तिवाद होता.

दोन्ही बाजूंचा विचार व्हावा
^स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असे वाद होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपण विकासकामे करायला हवीत. डोणगावकरांची चूक झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई होईलच, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे म्हणणे जर एखादा अधिकारी ऐकत नसेल तर त्यावरही विचार व्हावा. -अब्दुल सत्तार, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

प्रकरण ताणण्यात अर्थ नाही
^कुणावर अन्यायहोणार नाही अशी आमची भूमिका आहे. डोणगावकरांचे काय म्हणणे होते हे कोणी ऐकून घेतले नाही. नेमके काय झाले हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला, परंतु ते उपलब्ध झाले नाहीत. हे प्रकरण ताणण्यात अर्थ नाही, असे वाटते. -सुभाष झांबड, आमदार, काँग्रेस
बातम्या आणखी आहेत...