औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १३ ते १६ डिसेंबरदरम्यान युवक महोत्सव होणार आहे. यात सेलिब्रिटींना बोलावण्यास राष्ट्रवादीपाठोपाठ आता एनएसयूआय तसेच रिपब्लिकन विद्यार्थी सेनेनेही विरोध दर्शवला आहे. मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना सेलिब्रिटींना बोलावून लाखो रुपये खर्च करण्याऐवजी तो निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरावा, असे संघटनांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
दुष्काळी परिस्थिती असताना सेलिब्रिटींवर लाखोंची उधळपट्टी करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय वाहुळ यांनी व्यक्त केले होते. मुळात युवक महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आहे. शिवाय या महोत्सवात विजयी ठरलेल्यांना "इंद्रधनुष्य' आंतरविद्यापीठात पाठवण्यात येते. मात्र, हा महोत्सव ते नोव्हेंबरदरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात झाला. त्यामुळे केंद्रीय महोत्सवात विजेत्यांना सहभागी होता येणार नाही. हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहणार आहे. त्यामुळे सेलिब्रिटींना बोलावता महोत्सव घेण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. महोत्सवाचे आकर्षण म्हणून लाखो रुपये खर्चून उद््घाटनाला सोनाली कुलकर्णी, तर समारोपाला अतुल कुलकर्णी या कलावंतांना आमंत्रित केले आहे. त्यांना मानधनापोटी लाखो रुपयांची रक्कम द्यावी लागते, परंतु मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. त्यामुळे सेलिब्रिटींवर होणारा खर्च टाळून दुष्काळी भागात मदत दिली जावी, असे संघटनांचे म्हणणे आहे. या मागणीसंदर्भातील निवेदन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, कुणाल भालेराव, चिरंजीव मनवर, परमेश्वर चिंतामणी, एनएसयूआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमिर शेख यांनी डॉ.बी.ए. चाेपडे यांना दिले.