आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर केक कापाल तर वाढदिवस तुरुंगात, पोलिस आयुक्तांची तंबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा सध्या तरुणाईत ट्रेंड आहे. भर चौकात चारचाकीचे बोनेट किंवा दुचाकीच्या सीटवर केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणारे तरुण मित्रमंडळांना आता जेलची हवा खावी लागणार आहे. सिडको परिसरातील कॅनॉट भागात नियम धाब्याबर बसवणाऱ्या सहा तरुणांवर कारवाई करण्यात आली असून या भागातील सहा हॉटेल पुढील दहा दिवसांकरिता बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. 

कॅनॉट परिसरात उडाणटप्पूंचा हैदोस सुरू असतो. रात्री-बेरात्री या भागात तरुण केक कापून वाढदिवस साजरा करतात. भरधाव गाड्या चालवतात. चौकाचौकांत गटागटाने उभे राहतात. याचा महिला नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार या भागातील महिला व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्तांकडे केली. या वेळी आमदार अतुल सावे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, कॅनॉट व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी ज्ञानेश्वर खर्डे, अनिल सालुमन, प्रदीप राठोड यांची उपस्थिती होती. 

शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त राहुल श्रीरामे, संदीप आटोळे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, गोवर्धन कोळेकर, ज्ञानोबा मुंढे, पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती, मधुकर सावंत, अविनाश आघाव यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा एक तास या भागात होता. 

हॉटेल बंद
आयुक्तांच्या आदेशावरून हॉटेल शिवा, व्हीआयपी मराठा, मराठा, कोयला, पंजाबी चुला, जॉइंट कॅफे आदी हॉटेल १३ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय विनाहेल्मेट गाडी चालवणे, भरधाव गाडी चालवणे, दुचाकीवर ट्रिपल सीट जाणे, मोठ्या आवाजात टेप लावून चारचाकी चालवणे, रस्त्यावर केक कापणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात येईल. विशेष म्हणजे त्यांच्या पालकांना घटनास्थळी बोलावले जाईल, असे सिडको पोलिसांनी सांगितले. या शिवाय फुटपाथवरही अतिक्रमण काढण्याचे पोलिसांनी सांगितले. 

याभागात रस्त्यावर होतात वाढदिवस साजरे
कॅनॉट, निराला बाजार, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी, वाळूज महानगर, क्रांती चौक, हर्सूल, गुलमंडी, कटकट गेट, नवाबपुरा, गांधी पुतळा, जयभवानीनगर, सिंधी कॉलनी, सेव्हन हिल, गारखेडा परिसर, पदमपुरा, नारेगाव, उस्मानपुरा, जाधवमंडी, चौराहा, केळी बाजार या भागात रात्री रस्त्यावर वाढदिवस साजरे केले जातात. शिवाय तलवारीने केक कापण्याचे प्रकारही घडतात. 

तरुणीचा विनयभंग, भावाला मारहाण
सिडको भागात राहणारी २६ वर्षीय तरुणी ३ मार्चला सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास भावासोबत कॅनॉट प्लेस येथे गेली असता शेख अज्जू शेख अजमोद्दीन (२७) याने तिचा पाठलाग करत तिच्याशी अश्लील चाळे केले. भावाने प्रतिकार करताच अज्जूने त्याला मारहाण केली शिवाय तरुणीच्या हातातील मोबाइल हिसकावून तो फोडला. अज्जूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
कारवाईचा करिअरवर परिणाम 
नियममोडणाऱ्यातरुणांवर कलम १४३ ३४१ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईचा त्यांच्या करिअरवर परिणाम होतो. अशा कुठल्याही प्रकरणात तरुण सापडल्यास पालकांनादेखील समज देण्यात येणार आहे. -कैलास प्रजापती, पोलिस निरीक्षक, सिडको पोलिस ठाणे 
बातम्या आणखी आहेत...