आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा महत्त्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार प्राप्त व्यक्तिंची समाजाविषयी असलेली जबाबदारी वाढली आहे. शासनाने केलेले काम समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य पुरस्कार प्राप्त व्यक्तिंनी करावे. त्यांनी शासनाचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कारांचे रविवारी येथील संत तुकाराम नाट्यगृहात वितरण करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यासह ७१ व्यक्ति आणि सामाजिक संस्थांना सन्मानित करण्यात आले.
या समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री सचिन अहिर, बाबासाहेब गोपले, महापौर अनिता घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा नाहिदबानो फिरोजखान पठाण, आमदार सतिश चव्हाण, प्रितमकुमार शेगावकर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव नितीन गद्रे, आयुक्त आर.पी. गायकवाड, विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज विकासासाठी मंत्र दिला आहे. येथून पुढे सुद्धा त्याच मार्गाने चालण्याचा निर्धार आपण सर्वांनी केला पाहिजे. शासनाने राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार सर्व समाज घटकांना निधीचे वाटप करणारे एकमेव राज्य म्हणून प्रत्येक समाज घटकासाठी मोठी तरतूद केली आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी चैत्यभूमिलगत असलेल्या इंदू मिलच्या जागेवर संपूर्ण बारा एकरमध्ये डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा शासनाचा ठाम निर्धार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.