आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित सेन्सर चिप तयार केली आहे. हवेतील 16 प्रकारची प्रदूषके (एअर पोल्युटन्टस्) हुडकून काढणारी ही चिप ‘मल्टी अॅनालाइज सेन्सिंग गॅझेट’ या उपकरणात बसवली जाणार आहे. जगातील संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरावी अशी ही करामत केली आहे भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. महेंद्र शिरसाट यांनी. अमेरिकेत यापूर्वी शोधलेल्या तंत्रापेक्षा डॉ. शिरसाट यांचे हे संशोधन अद्ययावत आहे.
पर्यावरण प्रदूषण ही संपूर्ण जगाचीच जटिल समस्या असल्याने अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये व्यापक प्रमाणात हवा प्रदूषणावर संशोधन सुरू आहे. मात्र, हवेतील प्रदूषके ओळखणे, ती शोधून काढणे आणि वेगळी करणे याबाबत अद्यापही शास्त्रज्ञांना हवी तशी सफलता मिळालेली नाही. डॉ. शिरसाट यांना मात्र वायुरूपातील 16 प्रकारची प्रदूषके 'डिटेक्ट' करणारी सेन्सार चिप तयार करण्यात यश आले आहे. त्याचा पुढचा टप्पा 'मल्टी अँनालाइज सेन्सिंग गॅझेट' उपकरण निर्माण करणे हा असून त्यावर संशोधन सुरू आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ प्रकल्प) 2007 ते 2009 या कालावधीत 13 महिने संशोधन केल्यानंतर त्यांनी मराठवाडा विद्यापीठात संशोधन सुरू केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार तरुण संशोधकांची चमू काम करीत आहे.
दीड कोटींचे अनुदान :
या संशोधन प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची आवश्यकता होती. डॉ. शिरसाट यांनी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाशी (डीएसटी) संपर्क साधला. या विभागाला संशोधन प्रकल्पाचा अंदाजित खर्चाचा प्रस्ताव सादर केला. त्यास त्वरित मान्यता देऊन दीड कोटी रुपये अदा करण्यात आले.
चिपमध्ये सोने, सिलिकॉन
500 मायक्रोमीटर सिलिकॉन, 18 नॅनोमीटर सोने आणि 20 नॅनोमीटर क्रोमियम या धातूंची सेन्सर चिप.
अमेरिकेहून आणले तंत्र
एक घनमीटर प्रदूषित घटकाचे 10 हजार भाग (जास्त सॅम्पल) शोधण्याचे हे तंत्रज्ञान अमेरिकेला अवगत आहे. मात्र, त्यापेक्षा अद्ययावत एक घनमीटरमध्ये (कमीत कमी सॅम्पल) केवळ एक हजार भाग शोधण्याचे तंत्र डॉ. शिरसाट यांनी विकसित केले.
कोणती प्रदूषके शोधणार ?
मानवी आरोग्य, पक्षी, प्राणी आणि वनस्पतींसाठी घातक ठरणारे हायड्रोजन सल्फाइड, अमोनिआ, सल्फरडाय ऑक्साइड, मिथेन, बाष्परूपातील ऑरगॅनिक पदार्थ, बेन्झिन, टोलिन, झायलिन यासह इतर घातक घटक या चिपमध्ये डिटेक्ट होतील. त्यांची पीपीएममधील मात्राही सेन्सरच्या माध्यमातून दिसेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.