आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- दुष्काळी परिस्थितीमुळे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा जाहीर वेळापत्रकाच्या पंधरा दिवस आधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची शनिवारी बैठक झाली, त्या वेळी या निर्णयाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली.
या निर्णयामुळे औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील विद्यापीठाशी संलग्नित सर्व 419 महाविद्यालयांची परीक्षा पंधरा दिवस आधी होईल. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परीक्षा सुधार समितीने शिफारस केलेल्या सर्व सूचनांवरही चर्चा करण्यात आली. राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला होता. पेपरफुटी रोखण्यासाठी सर्वच विषयांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याची शिफारस परीक्षा सुधार समितीने केली आहे. डॉ. पांढरीपांडे यांनीही कुलपतींना परीक्षांसंबंधी अहवाल सादर केला. या दोन्ही अहवालांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. अभियांत्रिकीतील ‘इलेमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग’ आणि ‘इलेमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ या दोन विषयांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता ऑनलाइन पेपरची संख्या सातपर्यंत नेण्याचा परीक्षा मंडळाचा विचार आहे.
त्याशिवाय 32/6 च्या समितीने सादर केलेल्या काही अहवालांनाही तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीला परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. उल्हास शिंदे, सामाजिकशास्त्रांचे डॉ. विलास खंदारे, विज्ञानचे डॉ. अशोक मोहेकर, वाणिज्यचे डॉ. कल्याणराव लघाणे, शिक्षणशास्त्राच्या डॉ. शोभना जोशी, विधी शाखेचे डॉ. भीमेनी चौधरी यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.