आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- मराठवाड्याला वेढणार्या दुष्काळाचे पडसाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात उमटले. दुष्काळाच्या मुद्यावरून अधिसभा सदस्य आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. कोणतीही गोष्ट फुकटात मिळाली तर त्याची किंमत राहत नाही, असे म्हणत सुळेंनी दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांची खिल्ली उडवली.
विद्यापीठाच्या नूतन नाट्यगृहात गुरुवारी (24 जानेवारी) झालेल्या सोहळ्यात विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. त्यात कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष कल्याणी शिंदेने विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. यानंतर टोपेंनी विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या योजनांची माहिती देण्यास सुरुवात केली. तेवढय़ात सभागृहात बसलेले अधिसभा सदस्य डॉ. पंडित तुपे ताडकन उभे राहिले. ‘परीक्षा शुल्क काय माफ करता? आधी शैक्षणिक शुल्क माफ करा. तुम्ही नेहमीच घोषणा करता, पण विद्यार्थ्यांच्या फायद्याचे काहीच होत नाही’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यावर टोपे संतापत म्हणाले, ‘तुम्ही आधी खाली बसा. मी काय बोलावे, दुष्काळासाठी काय करावे ते मला कळते. उगाच बडबड करू नका.’ तेवढय़ात आमदार चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इशारा केला. राष्ट्रवादीचे संतोष लोखंडे, सचिन मुळे यांनी तुपे यांच्या खांद्यावर दाब देऊन त्यांना खाली बसवले.
या वेळी कुलसचिव डॉ. धनराज माने, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. वाल्मीक सरवदे, विद्यार्थी परिषद सचिव सोनाली दहातोंडे यांची उपस्थिती होती. वर्षा खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.
सुळेंचेही सल्ला सत्र
खासदार सुळे यांनी टोपेंची पाठराखण केली. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी नेहमी चांगलीच कामे करते. लोकांना सर्वच गोष्टी फुकट मिळाल्या, तर त्याची किंमत राहत नाही. पण आपण स्वत: खरेदी केलेला बिस्कीटचा पुडा कुणीही फेकून देत नाही. सरकारकडून खैरात मागू नका. स्वाभिमान देईल, असे शिक्षण मागा. स्वायत्त विद्यापीठाऐवजी स्वायत्त विद्यार्थी तयार करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
टोपेंच्या घोषणा
1.संशोधक विद्यार्थ्यांना साडेसहा हजार रुपये शिष्यवृत्ती देणार. 2. प्रत्येक जिल्ह्यात 500 मागासवर्गीय विद्यार्थिनी, आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधणार 3. सायन्स पार्कसाठी शासनातर्फे 25 टक्के निधी.
हीरोगिरीचा हेतू नव्हता
परीक्षा शुल्कासोबत शैक्षणिक शुल्क माफीचा मुद्दा टोपेंच्या निदर्शनास आणून द्यावा, असा माझ्या बोलण्यामागील प्रमुख हेतू होता. हीरोगिरी करण्याचा हेतू नव्हता.’’ प्रा. पंडित तुपे, विद्यापीठ सिनेट सदस्य
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.