आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Babasaheb Ambedkar University VC Stay Pend Issue

कुलगुरूंनी मानधन परत करावे; भीमशक्ती विद्यार्थी संघटनेची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी घेतलेले मानधन त्वरित परत करावे, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी भीमशक्ती विद्यार्थी संघटनेने केली आहे. सोमवारी सादर केलेल्या निवेदनात कुलगुरूंनी मानधन परत केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ‘काटकसर करण्याचे आदेश देणार्‍या कुलगुरूंनी घेतले भाषणांचे मानधन’ हे वृत्त ‘दिव्य मराठी’च्या 4 जानेवारी 2013 रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाले. विद्या प्रबोधिनीमध्ये त्यांनी चार भाषणांचे तीन हजार रुपये मानधन घेतले होते. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला असून भीमशक्तीने तर कुलगुरूंना घेतलेले मानधन परत करण्याचे सांगितले आहे.

दोन दिवसांत पैसे परत केले नाही तर राजीनाम्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्नेहसंमेलन रद्द करण्याचा आदर्श ठेवणार्‍या कुलगुरूंनी नैतिकतेला आणि कुलगुरू पदाची रया घालवल्याचे भीमशक्ती विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल दांडगे यांनी म्हटले आहे.

संघटना कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी ठाम असून कुलपतींकडे लेखी तक्रार करण्यात येईल, असे शहराध्यक्ष संतोष भिंगारे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र अंडरप्रिव्हलेज्ड टीचर्स असोसिएशनचे (मुप्टा) अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांनी बुधवारी या विषयावर प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. कुलगुरूंची कृती जर अनैतिक असेल तर त्यांच्या नेतृत्वात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारीही त्यांचे अनुकरण करतील, अशी भीतीही डॉ. अंभोरे यांनी व्यक्त केली आहे, तर कुलगुरूंना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही दंड ठोठोवल्याने त्यांना पदावर राहण्याचा तसाही अधिकार नसल्याचे मूलभूत शिक्षण अधिकार मंडळाचे संयोजक बुद्धप्रिय कबीर यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातही राजीनाम्याची मागणी केली आहे. अभाविपचे नेते आणि विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. गजानन सानप यांनी 13 मार्च रोजी होणार्‍या अधिसभेत त्यांना जाब विचारण्यात येईल.