आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाने प्रमुख पाहुण्यांचा केला अपमान; कुलगुरूंच्या भूमिकेमुळे सभागृह झाले रिकामे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या भाषणासाठी सभागृहात तुडुंब गर्दी झाली होती. मात्र, त्यांच्या गैरहजेरीत आमदार सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांनी आपली भाषणांची हौस भागवून घेतली. त्यानंतर मात्र बाहेर पडण्याची घाई केली. ‘राजर्षी शाहू महाराज ते यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राची जडणघडण’ या विषयावर बीजभाषणासाठी निमंत्रित फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. सोपानराव रोडे यांचा अवमान करण्यात आला.

कुलगुरूंच्या अध्यक्षीय भाषणापूर्वी बीजभाषण करण्याचे संकेत असून त्याप्रमाणे उद्घोषणा केली जात होती; पण सूत्रसंचालक शिंदे यांना विक्रम काळे यांनी मध्येच थांबवले. स्वत: भाषणातून चौफेर फटकेबाजी केली, पण डॉ. रोडे यांचे ऐकण्याचे टाळले. शिंदे यांना म्हणाले, ‘ तुमचे बीजभाषण होत राहील.आता अध्यक्षीय समारोप घ्या.म्हणजे आम्हाला जाता येईल.!’ यावर कुलगुरूंनी काहीच टिप्पणी केली नाही. त्यामुळे शिंदेंनी पुन्हा डॉ. रोडे यांच्या नावाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला; पण जाहीर सभेच्या स्टाइलमध्ये काळे यांनी ‘कुलगुरूंचेच नाव घ्या’ असे फर्मान सोडले. त्यावर चव्हाण यांनी होकारार्थी मान डोलावल्याने कुलगुरूंचाही नाइलाज झाला. त्यामुळे किरकोळ बदलाच्या नावाखाली कुलगुरूंचे भाषण करवून घेण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांसह श्रोत्यांनीही संपूर्ण सभागृह रिकामे केले.
पंधरा मिनिटांच्या विश्रांतीनंतर कसेबसे बीजभाषण करून घेण्यात आले. बीजभाषणादरम्यान आमदारांनी विश्रामगृहात भोजनाचा आस्वाद घेतला. या वेळी मात्र आमदार आणि कुलगुरूंनी घेतलेल्या भूमिकेच्या चर्चेला उधाण आले होते.

पुढील स्लाईडमध्ये - यशवंतराव सत्ताकारणी- राजकारणी नव्हते, तर समाजकारणी होते

धार्मिक वितंडवादावर केली सडकून टीका