आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैयक्तिक हल्ले त्रासदायक ठरले, माजी आयुक्त डॉ. भापकरांनी केले मन मोकळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रस्ता रुंदीकरण मोहिमेमध्ये माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, त्याचा माझ्या कामकाजावर, वैयक्तिक जीवनावर परिणाम झाला नाही, परंतु वैयक्तिक स्वरूपाचे हल्ले माझ्यासाठी त्रासदायक ठरले, असे महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.

आयुक्तपदाची सूत्रे डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे सोपविल्यानंतर डॉ. भापकरांनी त्यांची नवी इनिंग कुठे सुरू करायची, हे अद्याप ठरविलेले नाही. सध्या ते औरंगाबादेतच काही दिवस विर्शांती घेत मित्रपरिवार, स्नेहीजनांसोबत गप्पांची मैफल जमवत आहेत. अशीच एक मैफल सोमवारी (18 फेब्रुवारी) पत्रकारांसोबत झाली. त्या वेळी ते म्हणाले की, रस्त्यांचे रुंदीकरण हे सर्वात मोठे आव्हान होते. ते यशस्वीपणे पेलल्याचे समाधान आहे. मोहीम सुरू झाल्यावर अनेकांनी त्यास आक्षेप घेतला. राजकीय वर्तुळातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. माझ्यावर आरोपही करण्यात आले, पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट मी अधिक उत्साहाने काम करत गेलो. वाटेत आलेले अनेक अडसर दूर केले. त्या वेळी प्रत्येक दिवस ताण-तणावाचा होता. मात्र, जेव्हा माझ्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप झाले (विधी सल्लागार अपर्णा थेटे प्रकरण) त्या वेळी मी अत्यंत व्यथित झालो होतो. ते दिवस अत्यंत वाईट गेले.

समांतर होणारच

समांतर जलवाहिनीची योजना गेल्या तीन वर्षापासून फक्त चर्चेतच आहे. ती प्रत्यक्षात कधी येणार का, असे विचारले असता डॉ. भापकर म्हणाले की, समांतरमध्ये केंद्र आणि राज्य शासन तसेच कंत्राटदार आणि मनपा असे चार भागीदार आहेत. त्यामुळे योजनेच्या आखणीपासून ते अंमलबजावणीपर्यंत अनेक त्रुटी समोर येत आहेत. एकवेळ तर मी कंत्राट रद्द करण्याचाही विचार करत होतो. मात्र, नव्याने मांडणी करणे म्हणजे योजना आणखी एक दीड वर्ष लांबणे असे लक्षात आल्यावर विद्यमान योजनेतील त्रुटी दूर करण्यावर भर दिला. आता समांतर अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी तिचे काम सुरू होऊ शकते, असे चित्र आहे.

महिला पदाधिकारी समंजस
विजया रहाटकर, अनिता घोडेले आणि कला ओझा या तिन्ही महापौरांसोबत काम करणे फारसे त्रासदायक गेले नाही. सर्वच पदाधिकारी अतिशय समंजस होते. रहाटकरांच्या काळात राजकीय स्तरावर काही अडचणी होत्या, पण त्या त्यांनीच दूर केल्या म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेता आले, असेही डॉ. भापकर म्हणाले.