आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.babasaheb Ambedkar Marathwada University Issue, Student Harassment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थिनींना पिटाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी ठिकठिकाणाहून आलेल्या 40 विद्यार्थिनींनी वसतिगृहात थांबू द्यावे, अशी विनंती केली. परंतु विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी ‘फुकटात कधीपर्यंत राहणार?’ असे म्हणत सर्वांना पिटाळून लावल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला.

ऐनवेळी वसतिगृह नाकारण्यात आल्याने सर्वच विद्यार्थिनींना नातेवाईक, मैत्रिणींच्या घराचा रस्ता धरावा लागला. मागील वर्षी दुष्काळामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यांत वसतिगृहात मोफत राहण्याची सोय करून देण्यात आली. जूनअखेरपर्यंत विद्यार्थी राहिल्यामुळे किरकोळ दुरुस्तीची कामे होऊ शकलेली नाहीत. मात्र आता विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेसाठी विदर्भ आणि मराठवाड्यातून विद्यार्थी-विद्यार्थिनी विद्यापीठात आले आहेत. प्रवेश होईपर्यंत पूर्वी विद्यार्थिनींना ‘गेस्ट चार्ज’ अंतर्गत राहू दिले जात होते. यंदा मात्र राहण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लाइफ सायन्सेस, सामाजिक शास्त्रे आणि कला विद्याशाखांतील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थिनींनी डॉ. सरवदे यांची भेट घेतली तर त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. ‘मागील सत्रामध्ये दुष्काळामुळे मोफत जेवण दिले, यंदा वसतिगृहाचे शुल्क माफ आहे. असे फुकटात राहण्याची सोय कधीपर्यंत करून द्यायची?’ अशा शब्दांत त्यांनी अपमान केल्याचे विद्यार्थिनींनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

15 जुलैपर्यंत प्रश्न सुटेल
मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाचे वसतिगृह शुल्क माफ करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने यापूर्वीच घेतला आहे. अगोदर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन यादी झळकणार आहे. एक जुलैपासून वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 15 जुलैपर्यंत ती पूर्ण होऊन मुलींना अथवा मुलांना वसतिगृहात राहता येईल. तोपर्यंत राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थिनींचा आरोप तथ्यहीन
ज्या विद्यार्थिनींनी गेस्ट चार्जवर राहू देण्याची विनंती केली, त्यांची फॅकल्टी हाऊसमध्ये सोय केली आहे. दुरुस्तीची कामे सुरू असून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनीच उत्स्फूर्तपणे बैठक घेऊन सहकार्य करण्याचे मान्य केले. त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य नाही
-डॉ. वाल्मीक सरवदे, विद्यार्थी कल्याण संचालक.