आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Sanjay Panat Meet Bharatratna Sachin Tendulkar

सचिनची ती अविस्मरणीय भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ते 1998 साल होते. मुंबईत अस्थिरोग शल्यतज्ज्ञ म्हणून काम करताना एका व्यग्र दिवशी मला माझ्या ज्येष्ठ डॉक्टरांचा फोन आला, की एक 50 वर्षांच्या महिला पायाच्या शस्त्रक्रियेसाठी अँडमिट होणार आहेत. आम्ही त्या महिलेच्या केसवर फोनवरच चर्चा केली. फोन ठेवता-ठेवता ते डॉक्टर म्हणाले, ही महिला सचिन तेंडुलकरच्या सासूबाई आहेत! हे ऐकताच मी हरखून गेलो. आम्ही अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवर उपचार केले होते, पण हा रुग्ण विशेष होता. या निमित्ताने सचिनला भेटता येईल याची मला खात्री होती. त्या महिला रुग्णालयात आल्या तेव्हा असे लक्षात आले की, त्या सचिनच्या पत्नी अंजली यांच्या मावशी होत्या. त्यांच्या पायावरील शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली. काही दिवसांनी त्यांनी (मावशी) मला विचारले, ‘डॉक्टर, सचिन मला भेटायला येतो आहे आणि त्याला सर्व डॉक्टरांना भेटायचे आहे. तुमच्या सोयीची वेळ कोणती?’ मनात म्हटले, काय सांगावे यांना! सचिन भेटण्यासाठी आमची वेळ मागतो आहे! काही सुचत नव्हते. हे त्यांच्या लक्षात आले असावे. त्या म्हणाल्या, मी उद्या संध्याकाळची वेळ देते. दुसरा दिवस सचिनच्या भेटीची ओढ घेऊनच उगवला. मी काय बोलावे, कसे बोलावे हे दिवसभर मनात ठरवत होतो. सचिन येणार म्हणून अख्ख्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, स्टाफ हजर होता. फक्त मलाच सचिनच्या भेटीसाठी रुग्णाच्या खोलीत सोडण्यात आले. आत गेलो तेव्हा सचिन खुर्चीत बसलेला होता. मला पाहताच तो उठला आणि हस्तांदोलन केले. त्याचे पहिले वाक्य होते, ‘धन्यवाद डॉक्टर, माझ्या सासूबाईंची काळजी घेतल्याबद्दल.’ मी अवघडून गेलो, पण त्यानेच माझी मन:स्थिती जाणून मला शस्त्रक्रियेबद्दल विचारले. किती टाके पडले, त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल, वगैरे. पुढच्या अध्र्या तासात मला श्रेष्ठत्व म्हणजे काय, हे लक्षात आले. तो उभ्यानेच बोलत होता. सुरुवातीची काही वाक्ये इंग्रजी आणि नंतर तो मराठीत बोलू लागला. माझ्या सर्व प्रश्नांना त्याने शांतपणे उत्तरे दिली. अस्थिविकारांची मला चांगलीच कल्पना आहे, असा विनोदही त्याने केला. त्याच्या बोलण्यात कुठेही औपचारिकता नव्हती. प्रामाणिकपणा आणि सत्य होते. निरोप घेताना त्याने मला एक छोटी भेट, भिंतीवरील घड्याळ दिले, ज्याच्याकडे आजही मी अभिमानाने पाहतो. आज मी विचार करतो, की केवढा मोठा माणूस, पण अहंकाराचा लवलेशही त्याच्यात नाही. प्रसिद्धी, पैसा आणि जागतिक मान्यता त्याच्या मूळ स्वभावात मुळीच बदल घडवू शकलेली नाही. मला ती भेट खूप काही शिकवून गेली. तो केवळ एक चांगला क्रिकेटर नाही, तर एक सर्वगुणसंपन्न माणूसही आहे. आज तो निवृत्त होत असताना मी अभिमानाने माझ्या मुलांना सांगू शकतो की, होय, मी सचिनला भेटलो आहे आणि त्याला स्पर्शही केला आहे! 0 डॉ. मंगेश पानट