आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Ambedkar Mahaparinirvan Program In Dr. BAM University

दलित उद्योजक भरतात साडेतेरा हजार कोटींचा कर; विविध सरकारी योजनांवरील खर्च केवळ पाच हजार कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशभरातील दलित उद्योजक 13 हजार 500 कोटींचा कर भरतात; परंतु सरकार दलितांसाठी विविध योजना व शिष्यवृत्तींवर केवळ पाच हजार कोटींपेक्षा कमी खर्च करते. दलित उद्योजकांनी 77 लाखांपेक्षा जास्त हातांना रोजगार दिला असून, 86 हजार 904 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. 2006 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात या उद्योजकांचे उद्योग क्षेत्रामध्ये योगदान 13 टक्क्यांवर आहे. आता मात्र हे योगदान 15 ते 20 टक्क्यांवर जाणार असल्याचा ठाम विश्वास ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्री’चे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केला.
उद्योजकांच्या मोठय़ा संघटनांमध्ये छोट्या-सूक्ष्म उद्योजकांची दखल घेतली जात नाही, म्हणूनच दशकापूर्वी ‘एससी-एसटी चेंबर ऑफ कॉर्मस’ची स्थापना झाली.
अलीकडे ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्री’ असे संघटनेचे नामकरण करण्यात आले. देशभरात सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त दलित उद्योजक असून, त्यातील एक हजार महाराष्ट्रातील आहेत. पुण्यात सर्वाधिक म्हणजेच 400, तर औरंगाबादमध्ये 300 दलित उद्योजक आहेत. देशभरातील सुमारे 500 पेक्षा जास्त कॉर्पोरेट कंपन्यांनी दलित उद्योजकांना व्हेंडरमधून जोडले आहे. तसेच ‘डिक्की’ची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे, असे कांबळे यांनी सांगितले.
पाच टक्के प्लॉट राखून ठेवणार
दलित उद्योजकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘डिक्की’तर्फे पाठपुरावा सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून नवीन एमआयडीसीमध्ये पाच टक्के प्लॉट राखून ठेवण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. दलित उद्योजकांच्या वतीने देशाच्या विकासात योगदान दिले जात असल्याने भारतीय मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे मतही कांबळे यांनी व्यक्त केले. येत्या दोन महिन्यांत ‘डिक्की’ची शहरात शाखा सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.