औरंगाबाद- धर्म, राज, अर्थसत्तेतून ग्रामीण भागात स्वार्थ सत्तांचा उदय झाला. कालचा शेतकरी मीठ, भाकरी खाऊन सुखी होता, परंतु आजच्या शेतकर्याला दुरवस्थेचे भान आले आहे. तो स्वस्थ, समाधानी नसून दाहकतेने जळत आहे. प्रा. पवार यांनी हेच बदल अनुभव, मानवी संवेदनातून यशस्वीपणे टिपले आहेत, असे मत लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. ललिता गादगे यांनी व्यक्त केले.
शिवार प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा शेतकरी साहित्य पुरस्कार यंदा नगरचे कवी प्रा. संतोष पवार यांना डॉ. गादगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रेरणा दळवी, पृथ्वीराज तौर, पद्माकर पवार उपस्थित होते.
डॉ. गादगे म्हणाल्या, प्रा. पवार यांच्या कविता उत्कट भाव, उपरोधिक स्वरातील बंडखोरी दर्शवतात. या कविता परिस्थितीतून घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ताकदीचा आवाका प्रचंड आहे. प्रा. संतोष पवार म्हणाले, रा. रं. बोराडे यांनी ग्रामीण साहित्याची परंपरा समृद्ध केली आहे. ग्रामीण साहित्याच्या दिंडीतील मी एक वारकरी आहे. तौर यांनी प्रा. पवार यांच्या साहित्यावर चिकित्सक समीक्षा केली. डॉ. कांबळे म्हणाले, बदलते ग्रामजीवन, गावगाडा, कृषी जीवनातील व्यथा यांच्या पूर्ण संवेदना प्रा. पवार यांची कविता टिपते. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.