आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University News In Marathi, Divya Marathi

शारीरिक शिक्षणाच्या 147 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, विद्यापीठाचे कारभार धक्कादायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांतर्गत मराठवाड्यातील 4 शारीरिक शिक्षण महाविद्यालयांतील एकूण 147 विद्यार्थ्यांचे भवितव्य ढिसाळ व्यवस्थापनामुळे अंधारात सापडले आहे. विद्यापीठाअंतर्गत एमपीएडच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा 8 ते 12 ऑक्टोबर 2013 या कालावधीत झाल्या. परीक्षा होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटून अद्याप निकालाचा पत्ता नाही. विद्यार्थी प्रथम सत्राच्या निकालाच्या प्रतीक्षेत असताना विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांना दुसर्‍या सत्राच्या परीक्षेसाठी सक्ती करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


नाव न सांगण्याच्या अटीवर एमपीएड प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ही माहिती ‘दिव्य मराठी’ला दिली आहे. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील पवन गोरे या विद्यार्थ्याचे उपोषणाचे प्रकरण ताजे असताना आता या विभागातील आणखी एक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. एमपीएड अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राची परीक्षा 8 ते 12 ऑक्टोबर 2013 या कालावधीत झाली. पाच महिने उलटूनही अद्याप परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. पुढल्या महिन्यात द्वितीय सत्राची परीक्षा होणार आहे. यासाठी व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा फॉर्म न घेता त्याआधीच परीक्षा शुल्क (प्रत्येकी 1275 रुपये) वसूल केल्याचीही माहिती आहे.


चौकशी समितीचा अहवाल गुलदस्त्यात
शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांच्या 2013-14 सत्रातील महाविद्यालयांतर्गत घेतल्या गेलेल्या परीक्षांचा निकाल संशयास्पद होता. यामुळे विद्यापीठाने डॉ. कल्पना झरीकर, डॉ. रंजन बडवणे आणि डॉ.एस.एम.कोठे या सदस्यांची चौकशी समिती नेमली. समितीला त्यांचा अहवाल देण्यासाठी फक्त चारच दिवसांचा वेळ देण्यात आला होता. या समितीने त्यांचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केला आहे. विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांतील चाचणी, सत्र आणि प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये अनिश्चितता आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या समितीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. विद्यापीठ प्रशासन जाणूनबुजून हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.


शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रमुखाला पदावरून निलंबित करण्यात आले आहे. ते कार्यालयात येतच नाहीत आणि आधीच्या परीक्षेसंबंधीची कागदपत्रे आमच्याकडे आली नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. डॉ. सुरेशचंद्र झांबरे, संचालक, बीसीयूडी

कुलगुरूंचे दुर्लक्ष
काही विद्यार्थ्यांच्या अँडमिशन प्रकरणाच्या गोंधळामुळे चौकशी सुरू असल्याने सध्या विभागप्रमुख डॉ. संजय चंद्रशेखर यांचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत. अशात शारीरिक शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांकडे, त्यांच्या प्रश्‍नांकडे, अडचणींकडे लक्ष देण्यास कोणीही वाली नाही. काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची सुरक्षा रक्षकांकडून हकालपट्टी करण्यात आली.