आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University News In Marathi, Aurangabad

नसलेल्या पेपरचा सावळा गोंधळ!, विद्यापीठाचे गलथान कारभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बीएसडब्ल्यू शाखेचा नियमित इंग्रजी विषयाचा पेपर पुढे ढकलल्याची माहिती विद्यार्थ्यांना न दिल्याने शनिवारी मिलिंद महाविद्यालयासह अन्य महाविद्यालयांत एकच गोंधळ उडाला. लांबून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप तर झालाच, शिवाय पेपर नसल्याची माहिती महाविद्यालय तसेच प्राध्यापकांना नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. हा पेपर 15 एप्रिलला होणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा 10 मार्चपासून सुरू झाल्या आहेत. शनिवारी बीएसडब्ल्यू शाखेचा नियमित इंग्रजी विषयाचा पेपर होता. दिलेल्या वेळापत्रकात आणि हॉलतिकिटावरही शनिवारची (12 एप्रिल) तारीख असल्याने सकाळी 9:30 वाजताच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर हजर होते. पेपरची वेळ 10 ते 1 असल्याने विद्यार्थ्यांना आत सोडण्यात आले. पेपरची वेळ होऊनही विद्यापीठातून ऑनलाइन प्रश्नपत्रिका आल्या नाहीत. विद्यापीठात फोनवर संपर्क साधला असता कोणीही फोन उचलला नाही. यामुळे महाविद्यालयाने कर्मचार्‍यास परीक्षा विभागात पाठवले. तेव्हा आज होणारा पेपर निवडणुकीच्या कामामुळे पुढे ढकलण्यात आला असून हा पेपर 15 एप्रिला होणार असल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकाराची माहिती महाविद्यालय प्रशासन व विद्यार्थ्यांना नसल्याने गोंधळ उडाला.


विद्यार्थी आल्यानेच कळाले
निवडणुकांची माहिती असतानाही परीक्षेचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. रोज कोणत्या ना कोणत्या विषयाचा पेपर पुढे ढकलला जात असल्याने विद्यार्थ्यांवरही त्याचा मानसिक ताण येत आहे. वेळीच नियोजन केले असते तर आज ही वेळ आली नसती. प्राचार्या वैशाली प्रधान, मिलिंद कला महाविद्यालय


नियोजनाचा अभाव
सकाळी 9:30 वाजता विद्यार्थी पेपरसाठी हॉलमध्ये आले. बराच वेळ झाला तरी प्रश्नपत्रिका ऑनलाइन न आल्याने परीक्षा विभागाशी संपर्क साधला. पेपर पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. हॉलतिकिटावर 12 एप्रिल तारीख असल्याने विद्यार्थीही वेळेवर परीक्षा केंद्रावर हजर होते. भन्ते डॉ.सत्यपाल, परीक्षाप्रमुख


चौकशी करू
सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कमी वेळात परीक्षेची तारीख पुढे ढकलल्याची महिती देणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्वच महाविद्यालयांना आम्ही कळवले होते. तरी गोंधळ कसा झाला याची माहिती घेऊन चौकशी केली जाईल. डॉ. डी. एम. नेटके, उपकुलसचिव परीक्षा विभाग