आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Babasaheb Ambedkar News In Marathi, Rally, Birth Anniversary

जगात गाजावाजा..भीमराव एकच माझा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 123 वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून निघालेल्या मिरवणुकीत ‘जगात गाजावाजा..भीमराव एकच माझा’ हा आवाज घुमत होता. भडकल गेट येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायांनी रीघ लावली होती.
यंदा मिरवणुकीत डीजेला परवानगी मिळाली असली तरी ढोल-ताशांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता.

बाळगोपाळ, महिला आणि तरुणांच्या आनंदाला डीजे, ढोल-ताशे आणि जयघोषाने उधाण आले होते. क्रांती चौक, पैठण गेट, टिळक पथ, गुलमंडी, सिटी चौक, जुना बाजार आणि भडकल गेटपर्यंतचा रस्ता भीमसैनिकांनी ओसंडून वाहत होता. शहरातील गल्लीबोळातून सायंकाळी पाच वाजेपासून मिरवणुकांना सुरुवात झाली. तोपर्यंत मुख्य मिरवणूक मार्ग सर्वांसाठी खुला होता. मात्र जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसतशी गर्दी वाढत होती. सायंकाळी 6.30 नंतर रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. रात्री 11.30 पर्यंत अशीच स्थिती होती. रात्री उशिरापर्यंत शहरात सर्वत्र डीजे आणि ढोल-ताशांचा आवाज घुमत होता. मिरवणुकीतील स्वागत मंचावरील वाद्यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


25 ढोल, 10 ताशे : विविध पक्ष, मित्रमंडळे, संस्था आणि सामाजिक संघटनांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या वाहनांसमोर झांज, पावली, ढोल-ताशांच्या पथकांनी सर्वांचे लक्ष वेधले. पावन गणेश मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी ढोल-ताशांच्या पथकाने विविध प्रकारच्या ‘लयी’ सादर केल्या. या पथकात 25 ढोल व 10 ताशांचा समावेश होता. शाक्यनगर जयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत बाळगोपाळांनी पावली सादर केली. आमदार संजय शिरसाट यांच्या मैत्रैय क्रीडा मंडळाच्या वतीने ढोल व झांज पथकांनी आपल्या कला सादर केल्या.


पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मिरवणुकीला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. क्रांती चौक ते भडकल गेट या मार्गावर अध्र्या तासाने पोलिस पथकांकडून गस्त घालण्यात येत होती. पोलिस आयुक्त, उपायुक्त, पोलिस निरीक्षक यांच्यासह एकूण तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.


टक्का वाढीसाठी मतदार जागृती
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नानाविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मिरवणुकीत सहभागी झालेल्या रमानगर युवक मित्रमंडळाच्या वाहनावरही मतदारांमध्ये जागृती करणारे मोठे पोस्टर दोन्ही बाजूने लावण्यात आले होते. या बॅनरवर नि:स्वार्थपणे मतदान करण्याची शपथ लिहिण्यात आली होती. विविध मंचांवरील कार्यकर्त्यांनी भगवे आणि निळ्या रंगाचे मिर्शण करून फेटे बांधलेले दिसून आले.


गर्दी बघून प्रचाराची टूम
लोकसभेची निवडणूक दहा दिवसांवर येऊन ठेपली असून विविध पक्षांच्या उमेदवारांनी रॅली, मिरवणुकीतून प्रचार करण्याची संधी सोडली नाही. यात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे नितीन पाटील, समाजवादी पक्षाचे अँड. सदाशिव गायके कार्यकर्त्यांसह रॅलीत सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत सर्वच उमेदवारांनी क्रांती चौक ते सिटी चौकापर्यंतच्या विविध स्वागत मंचांना भेटी दिल्या.


यंदाचे देखावे हायटेक
यंदाच्या मिरवणुकीत डिजिटल देखावे विशेष होते. विनोद पाटील यांनी उभारलेल्या स्वागत मंचावर एलसीडीद्वारे बाबासाहेबांचे जीवनचरित्र दाखवण्यात आले. रतन साळवे मित्रमंडळाचा स्वागत मंच व महूनगर येथील युवक मित्रमंडळाच्या मिरवणूक वाहनात आकर्षक काचेच्या झुंबर व फुलांच्या आरास विशेष होती. बाबासाहेबांचे आकर्षक तैलचित्रही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. बैलगाडीच्या सुंदर सुवर्णरथात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती विराजमान होती. नागसेनवन मित्रमंडळाच्या वतीने संसद भवन तर मनसे जयंती उत्सव समितीने महाडच्या चवदार तळ्याचे पाणी दलितांसाठी खुले करण्यात आल्याचे डिजिटल चित्र तयार करण्यात आले होते.