आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.. Ambedkar's Books Translated Published In June Issue At Aurangabd, Divya Marathi

डॉ. आंबेडकरांची अनुवादीत पुस्तके जुनमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीत लिहिलेले मात्र प्रकाशित न झालेले ‘रिबेल्स इन हिंदुइझम’आणि त्यांचे गाजलेले भाषण ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ (जातीचे निर्मूलन) यास 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या ग्रंथांचे मराठी अनुवाद पूर्ण झाले असून जूनपर्यंत वाचकांच्या हाती पडणार आहेत. बाबासाहेबांच्या बावीस खंडांच्या पुनर्मुद्रणाचे काम डिसेंबर 2013 मध्ये देण्यात आले असून येत्या दोन महिन्यांत प्रथमच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रंथालयात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अविनाश डोळस यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील समाजसुधारकांची माहिती भावी पिढीला व्हावी, या हेतूने राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने शासकीय मुद्रणालयामार्फत त्यांचे ग्रंथ प्रकाशित केले जातात. मात्र, शासनाच्या लालफीतशाहीच्या धोरणामुळे 2005 पासून ग्रंथांचे पुनर्मुद्रण झाले नाही. यामध्ये समग्र अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह भाषा संचालनालय, शिक्षण विभाग, महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली, विधी विभागातील बदललेल्या धोरणांचेही मुद्रण झालेले नाही. प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर नागरी सेवा नियमावलींची पुस्तके तातडीने प्रकाशित करून शासकीय ग्रंथालयात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
प्रकाशन समितीमार्फत आतापर्यंत 22 खंड प्रकाशित झाले. यामध्ये त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झालेले ग्रंथ व महापरिनिर्वाणानंतर अप्रकाशित राहिलेले ग्रंथ प्रकाशित केले. 22 खंड बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत, तर दोन खंड संदर्भ म्हणूनही प्रकाशित करण्यात आलेले आहेत.

या ग्रंथांना मागणी जास्त असल्याने बाजारात येताच ते संपूनही जातात. वाचकांच्या मागणीचा विचार करता समितीचे प्रमुख असलेले अविनाश डोळस यांनी डिसेंबर 2013 मध्ये बैठक घेऊन या ग्रंथांच्या पुनर्मुद्रणाचे आदेश दिलेले आहेत. बाबासाहेबांच्या दोन ग्रंथाचे अनुवाद प्रा. प्रकाश शिरसाठ आणि भाषा संचालनालयाचे गौतम शिंदे यांनी पूर्ण केले आहेत.

हे ग्रंथ विभागीय कार्यालयाऐवजी आता प्रत्येक जिल्हा ग्रंथालयात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था पहिल्यांदाच करून देण्यात आली आहे. यामुळे आता कोणालाही विभागीय कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही.
शासकीय ग्रंथालयातून जुन्या प्रतींची विक्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात आतापर्यंत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र, 2006 पासून बाजारात जुन्याच संविधानाच्या प्रती शासकीय ग्रंथालयातून विक्री होत आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली आणि विधी विभागाने केलेल्या बदलाचीही नोंद पुस्तिकेत न करता जुन्याच पुस्तिका विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.