आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasasheb Ambedkar Marathawada Universitys Vice Chancellor Dr.B.A.Chopade Speak With Divya Marathi Team

विद्यापीठात सर्व शाखांमध्ये संशोधन, नावीन्याची गंगोत्री वाहणार - कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणजे सळसळत्या उत्साहाचा जिवंत झराच असल्याचा भास आज ‘दिव्य मराठी’च्या संपादकीय सहकार्‍यांना झाला. ओघवत्या, सहज आणि सोप्या इंग्रजीमध्ये नॉनस्टॉप बोलत ते किती तयारीने या विद्यापीठात आले आहेत आणि पुढे ते काय करणार आहेत याची जाणीव त्यांनी या वेळी करून दिली.
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. चोपडे यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी विविध योजना आणि विद्यापीठाच्या विकासाच्या विविध संकल्पना मांडल्या. पुढील काळात हे विद्यापीठ संशोधन आणि नावीन्य यासाठी देशात ओळखले जाईल, असा निर्धार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ. बी. ए. चोपडे यांनी बोलून दाखवल्याने विद्यापीठात इनोव्हेशनची जणू गंगोत्री वाहणार, असे वाटून गेले.
ते म्हणाले, सर्वप्रथम येथील उणिवा समजून घेत त्यावर काम करणार आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास दिसत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची क्षमता, गुणवत्ता आणि शिक्षणाच्या दर्जावर बोट ठेवले जाते. हा ठपका मिटवण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे आव्हान आहे. आपण ज्या विद्यापीठात शिकतो त्याचा अभिमान विद्यार्थ्यांमध्ये जागृत होणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध प्रकारचे किमान कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबवणार, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांना देखील प्रशिक्षण देण्यात येईल. याकरिता देश-विदेशातील नामवंत तसेच नोबेल पुरस्कार विजेते संशोधक त्यांच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करू, असेही डॉ. चोपडे यांनी सांगितले. विद्यापीठातील विद्यार्थी कोणत्याही ठिकाणी गेल्यावर तो एक ब्रँड अँम्बेसेडरप्रमाणे ओळखला जावा यासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील सर्वोत्तम विद्यापीठ बनवणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठाला गुणवत्ता, ज्ञान आणि संशोधनाच्या बळावर देशातील सवरेकृष्ट विद्यापीठ बनवण्याचे ध्येय आहे. माझ्या कार्यकाळात मी प्रयत्न करणार, असे डॉ. चोपडे म्हणाले.
राजकारणाला थारा नाही
कोणत्याही संस्थेचा विकास हा सर्वांच्या सहविचार आणि एकतेनेच होऊ शकतो. त्यामुळे विकासासाठी कोणत्याही राजकीय दबावास आपण बळी पडणार नाही, असेही या वेळी कुलगुरूंनी नमूद केले.
प्रशासन चालवणे ही एक कला
विद्यापीठातील राजकारण आणि त्याचा विद्यार्थी तसेच विद्यापीठावर होणारा परिणाम यावर मत प्रदर्शित करताना डॉ. चोपडे म्हणाले, प्रत्येक क्षेत्राला एक दिशा देण्याची गरज असते. प्रशासन सांभाळणे ही एक कला आहे. ज्ञानासमोर सर्व गोष्टी दुय्यम आहेत. त्यामुळे केवळ ज्ञान आणि विद्यापीठ, विद्यार्थी विकास हेच आपले ध्येय आहे. आपल्या अधिकारांचा वापर करत सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाच्या विकासासाठी आपण पारदर्शक प्रयत्न करणार आहे, असे डॉ. चोपडे म्हणाले.
1000 कोटी उभारणार
विद्यापीठाचा सर्वांगीण विकास, संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैशाची गरज भासेल. मात्र विद्यापीठाकडे स्वत:चे फारसे स्रोत नाहीत. त्यामुळे विद्यापीठासाठी लागणार्‍या निधीसाठी कॉर्पोरेट जगताची मदत मी घेणार आहे, असे कुलगुरू म्हणाले. सध्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत सामाजिक कार्यासाठी निधी दिला जातो. या तत्त्वावर देशभरातून विद्यापीठात निधी आणण्याचे साहस डॉ. चोपडे करणार आहेत.