आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य खुलवा : डॉ. महाजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सध्याच युग हे जाहिरातीचे आहे. क्रीम, लोशनच्या विविध कंपन्या जाहिरातीतून तत्काळ गोरेपणा मिळवण्याची भुरळ पाडतात. तात्पुरता गोरेपणा मिळतो, मात्र कालांतराने त्वचेवर होणारे परिणाम दीर्घकाळ राहतात. फसव्या जाहिरातींच्या बळी पडून महिला मोठ्या प्रमाणात स्वत:चे नुकसान करून घेतात. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य खुलवण्यावर भर द्या, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमित महाजन यांनी दिला.
ओंजळ महिला मंडळाच्या वतीने कुलस्वामिनी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती दराडे, ओंजळच्या संचालिका अनुराधा पुराणिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. महाजन म्हणाले, आधुनिक काळात महिला सौंदर्याविषयी दक्ष झाल्या आहेत. कामानिमित्त प्रत्येक महिला घराबाहेर पडत आहे. त्यामुळे प्रत्येकीला सुंदर दिसायचे आहे. एका दिवसात गोरेपणाचा दावा करणारी जाहिरात पाहून अनेक जणी त्याचा वापर करतात. मात्र, कलांतराने त्वचेचे नैसर्गिक सौंदर्यच नष्ट होते. डोळ्यांखाली काळेपणा आल्यावर महिला ब्यूटी पार्लरमध्ये जातात. मात्र, मुख्य कारण जाणून घेणे गरजेचे आहे. शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे काळी वर्तुळे निर्माण होत असल्याचे सांगितले.

डॉ. दराडे म्हणाल्या, सध्याच्या काळात गर्भाशयाचा कर्करोग महिलांमध्ये वाढला आहे. यासाठी महिलांनी चाळिशीनंतर सर्व आरोग्य तपासण्या करून घ्यायला हव्यात. महिलांच्या अनेक समस्या त्यांच्या दुर्लक्षामुळे उद्भवतात. रोज अर्धा तास पायी चालणे, प्राणायाम, योगा यावर भर दिला पाहिजे. वयात येणाऱ्या मुलींना मासिक पाळीविषयी योग्य माहिती दिली पाहिजे. ग्रामीण भागात महिला आरोग्यविषयक जनजागृतीची विशेष आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांसाठी अशा पद्धतीचा जनजागृतिपर कार्यक्रम घेऊन या मंडळाने सुज्ञपणाचे उदाहरण दिले आहे. ओंजळच्या संचालिका अनुराधा पुराणिक म्हणाल्या, विविध गुणकौशल्ये विकसित करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे, त्याविषयी जागरूक राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मंडळाच्या माध्यमातून जनजागृतीचा आमचा सतत प्रयत्न आहे.

परिसरातील ६० महिलांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सुनंदा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. संगीता जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुवर्णा पाटील, अंजली सेवेकर, मेघा लेंभे, मंजू थिगळे, भारती भालेराव यांनी सहकार्य केले.