औरंगाबाद - दहावी-बारावीच्या परीक्षेत ज्याप्रमाणे बारकोड पद्धतीच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येतात त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्येही बारकोड असलेल्या उत्तरपत्रिका देण्याचा विचार सुरू असून, त्याची सुरुवात ही अभियांत्रिकीच्या परीक्षांपासून केली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.
कुलगुरू डॉ. चोपडे यांना रुजू होवून शंभर दिवस पूर्ण झाले. यानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते.
आपण यशस्वी उपक्रम केल्याचे समाधान वाटत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. परीक्षा विभाग हा विद्यापीठाचा आरसा आहे. त्यात पारदर्शकता येणे आवश्यक आहे. म्हणून लवकरच बारकोड पद्धतीच्या उत्तरपत्रिका वापरण्यात येणार आहेत. याचा यशस्वी प्रयोग नॉर्थच्या विद्यापीठांमध्ये झाला आहे. यामुळे कार्यप्रणालीतही सुधार होऊन विद्यार्थ्यांच्या मनातही आपल्या गुणांबद्दल असलेली शंका दूर होईल. तसेच कोणचा पेपर कोण तपासत आहे, याची गुप्तताही बाळगता येईल. यामुळे हा उपक्रम करण्यात येत असून, याची सुरुवात अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेपासून होईल. त्यानंतर सर्वच शाखांमध्ये याचा वापर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन नवे पेटंट मिळाले असून ही यशस्वी वाटचाल असल्याचे त्यांनी सांगितले.